मतदानादरम्यान आमदाराने EVM फोडलं, ईव्हीएमचे तुकडे

मतदानादरम्यान आमदाराने EVM फोडलं, ईव्हीएमचे तुकडे

हैदराबाद: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे. सर्वत्र सुरळीत मतदान होत असताना, तिकडे आंध्र प्रदेशात अनोखा प्रकार घडला. आंध्र प्रदेशातील जन सेना पक्षाचे उमेदवार आमदाराने चक्क इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमची तोडफोड केली. अनंतपूर जिल्ह्यातील गुटी इथं हा प्रकार घडला. मधुसूदन गुप्ता (Madhusudhan Gupta) असं या तोडफोड करणाऱ्या आमदाराचं नाव आहे. लोकसभेसोबत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान हा प्रकार घडला.

मधुसूदन गुप्ता हे पवन कल्याण जन सेना पक्षाचे आमदार आहेत. मधुसूदन गुप्ता हे अनंतपूर जिल्ह्यात गुंटकाल विधानसभा मतदारसंघात गुटी इथं मतदानासाठी गेले होते. त्यावेळी गुप्ता यांनी ईव्हीएम जमिनीवर आपटलं.
गुप्ता हे मतदान करण्यासाठी गुट्टी इथं मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी तिथे लोकसभा आणि विधानसभा मतदानाबाबत नीट फलक लावले नसल्याने ते निवडणूक कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी थेट ईव्हीएम उचलून जमिनीवर आपटलं. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने आमदार मधुसूदन गुप्तांना ताब्यात घेतलं.

आंध्र प्रदेशातील 175 विधानसभा आणि 25 लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. चंद्राबाबूंचे सुपुत्र नारा लोकेश हे सुद्धा विधानसभेच्या मैदानात आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI