‘काही गुप्त गोष्टी…’, पार्थ पवार यांच्या Y+ सुरक्षेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

| Updated on: Apr 24, 2024 | 9:35 PM

"अजित पवार बोलले चार-पाच वर्षात सूत्र कोणाकडे जातील. हे समजून मात्र चार-पाच वर्षाला अजून खूप टाईम आहे. पुढील चार ते सहा महिन्यात काय होणार याची सूत्र सध्या शरद पवार यांच्या हातात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य हे शरद पवार हेच ठरवतात", असं जयंत पाटील म्हणाले.

काही गुप्त गोष्टी..., पार्थ पवार यांच्या Y+ सुरक्षेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
जयंत पाटील आणि पार्थ पवार
Follow us on

राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. पार्थ पवार हे सध्या त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. ते आपल्या आईसोबत बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. या दरम्यान त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांकडून या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर निशाणा साधला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली.

“काही गुप्त गोष्टी असतील, काही प्रॉब्लेम असतील. आपण काय बोलू शकतो? मात्र सरकारला त्यांना सुरक्षा पुरवावी वाटली असेल. त्यांना धोका आहे. मात्र तो सुक्या स्वकीयांपासून आहे की परकीयांपासून? हा तपशिलाचा भाग आहे. याबाबत गृहमंत्र्यांचे आभार मानतो की आमच्या जुन्या सहकाऱ्यांच्या मुलाला ही सुरक्षा दिली आहे. मात्र दादांचा मुलगा आहे. मी काही वैयक्तिक बोलणं योग्य नाही. जनता हे पाहत आहे की कोणाला सुरक्षा दिली कोणाच्या मागे पोलीस आहेत, कोणाच्या पुढे गाड्या आहेत, मी टीका टिप्पणी करणे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील यांची भाजपवर टीका

“पूर्वी पेट्रोल आणि डिझेल एक रुपयाने जरी वाढले तरी लोकांमधे नाराजी व्हायची आणि का वाढले? याचं स्पष्टीकरण त्यावेळी द्यावे लागायचे. मात्र आता हे ६० रुपयांचे पेट्रोल १०५ झाले तरी हे राज्यकर्ते काही बोलत नाहीत. राज्यातील नागरिकांची सर्वात मोठी फसवणूक ही पेट्रोल आणि डिझेल गॅसच्या दरवाढीमुळे झाली आहे. त्याचे स्पष्टीकरण न देता देवेंद्र फडणीस जुने व्हिडिओ काढत आहेत. मात्र जनतेला याचा खुलासा करणे महत्वाचे आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आता पंधरा वर्षाचे व्हिडिओ तुम्ही काढता. आमच्याकडे सुधा जुने व्हिडिओ आहेत. आज देशातलं सरकार आणि राज्यातल्या सरकार पेट्रोल गॅस आणि डिझेलच्या दरवाढी बाबत काही बोलत नाही. या सर्व महागाईला भारतीय जनता पक्षाला सगळी लोक धरत असून मत मागताना त्यांना दाद दिली जात नाही ही भाजपची मुख्य अडचण झाली आहे. म्हणून असे जुने व्हिडिओ काढून त्यांचं संशोधन सुरू आहे. मात्र त्याला खूप उशीर झाला आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

‘राष्ट्रवादीचं भवितव्य हे शरद पवार हेच ठरवतात’

“अजित पवार बोलले चार-पाच वर्षात सूत्र कोणाकडे जातील. हे समजून मात्र चार-पाच वर्षाला अजून खूप टाईम आहे. पुढील चार ते सहा महिन्यात काय होणार याची सूत्र सध्या शरद पवार यांच्या हातात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य हे शरद पवार हेच ठरवतात”, असं जयंत पाटील म्हणाले.