अहमदनगरमध्ये रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका

| Updated on: Jan 09, 2020 | 8:18 AM

कर्जत पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अश्विनी काणगुडे यांचा विजय झाला.

अहमदनगरमध्ये रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पुन्हा दणका दिला आहे. कर्जत पंचायत समितीमधील भाजपची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात (Karjat Panchayat Samiti Election) आली आहे.

आठ सदस्य असलेल्या कर्जत पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अश्विनी काणगुडे यांचा विजय झाला.

कर्जत पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या साधना कदम भाजपमध्ये जाऊन सभापती झाल्या होत्या.

या निवडणुकीत मात्र साधना कदम उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे तीनच सदस्य भाजपकडे राहिले. भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांनी सभापतीपदाचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या पाठबळावर अपक्ष असलेल्या अश्विनी कदम यांची बिनविरोध निवड झाली.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.

रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.

रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.

Karjat Panchayat Samiti Election