
हुबळी : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर घडामोडींना वेग आलाय. पवारांनी राजीनामा देऊ नये. त्यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहावं, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सिनेमा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कर्नाटकात सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. तिथं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर भाष्य केलं आहे. चार ओळीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे सगळं स्क्रिप्टेड होतं, असं मी म्हटलं नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
बारसू प्रकल्प आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिके यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका आहे. स्वतःच बारसूला प्रकल्प व्हावा असं पत्र लिहायचं आणि स्वतः तिथं जाऊन लोकांना चिथावणीखोर वक्तव्य करायची. उद्धव ठाकरे यांचा विकासविरोधी चेहरा समोर आला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना समाजाशी, विकासाशी काहीही देणं-घेणं नाही. निव्वळ राजकारण करायचं त्यासाठी दुसऱ्यांचे खांदे वापरायचे. आता त्यांना बारसूच्या लोकांचा खांदा मिळाला आहे, असंही ते म्हणाले आहेत.
आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. तर शरद पवार यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं, असा प्रस्ताव मंजूर केला आहे. या बैठकीनंतर राष्ट्र्वादीच्या महत्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि भेटीदरम्यान निवड समितीचा निर्णय सांगितला आहे. त्यावर थोडा वेळ द्या मी विचार करून निर्णय देतो, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय आता शरद पवार यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.