Ketaki Chitale : अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवणार?

अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट तिला भोवण्याची शक्यता आहे.

Ketaki Chitale : अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवणार?
Image Credit source: TV9
| Updated on: May 14, 2022 | 6:34 PM

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) अखेर ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर केतकीविरोधात कळवा, ठाणे, बीड आदी ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राज्यात अनेक भागात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. केतकीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. तसंच केतकीवर कारवाई होणारच असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला होता. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे.

पुणे पोलिसांत एफआयआर दाखल

केतकी चितळेविरोधात आतापर्यंत एकूण 3 ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुण्यातही केतकीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. कलम 153 (अ), 500, 501, 505 (2) अंतर्गत केतकीवर सायबर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती मिळतेय. दुपारी 2 वाजता हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

केतकी चितळेविरोधात एफआयआर दाखल

कोण केतकी चितळे माहिती नाही – पवार

केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्याबाबत खुद्द पवारांनाच विचारलं असता कोण केतकी चितळे माहिती नाही. तिने माझ्याबाबत काय लिहिलं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिलीय.

केतकी चितळेची पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट काय?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

जितेंद्र आव्हाडांचा इशारा

पवारसाहेबांवर अनेकवेळा टीका झाली. तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवार यांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं आणि नरक मिळावा अशी प्रार्थना करणं, हे एका स्त्रीला शोभण्यासारखं नाही. स्त्री ही मातेसमान असते. पवारांबाबत जे भयंकर लिहिलं आहे, ते शब्द तोंडातून निघतही नाहीत. असं का लिहावं वाटतं हा संशोधनाचा विषय आहे. इतिहासात भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही टीका केली होती. आम्ही पहिल्याच फटक्यात गांभीर्यानं घेत नाही. लोक मला सांगत आहेत की कशाला गांभीर्यानं घेता. वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप, त्याच्यावर चालून जाणारी विकृती कुणी असेल तर त्यांना रोखायला हवं. नाहीतर अशी वाढत जाणारी विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार. त्यामुळे हे विष संपवलं नाही तर ते समाजाला संपवून टाकेल, असा सूचक इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.