Maharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ

Maharashtra Assembly Session : एकनाथ शिंदेसाहेब आपण एकत्रं काम केलं आहे. कशामुळे घडलं काय घडलं. तुम्ही माझ्या कानात सांगितलं असतं ना अजित जरा उद्धवजींना सांग अडीच वर्ष झाली. आता मला द्या.

Maharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ
नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jul 03, 2022 | 3:58 PM

मुंबई: भाजपचे नेते राहुल नार्वेकर (rahul narvekar) हे विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यांचं स्वागत केलं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनीही भाषण करत नव्या अध्यक्षांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. आपल्या भाषणात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोलेही लगावले. अजित पवार (ajit pawar) यांनी आपल्या चौफेर भाषणात अनेक चौकार षटकार लगावत अनेकांची टोपी उडवली. नार्वेकर कशी सर्वांशी जवळकी साधतात, याचा किस्सा त्यांनी ऐकवला. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं महाजनांना कसं दु:ख झालं. दीपक केसरकर कसे चांगले प्रवक्ते झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी कानात सांगितलं असतं तर त्यांना मुख्यमंत्री केलं असतं… असं सांगत अजित पवार यांनी आपल्या भाषणातून तुफान टोलेबाजी केली.

तुम्हाला तिथं बसवलं असतं

एकनाथ शिंदेसाहेब आपण एकत्रं काम केलं आहे. कशामुळे घडलं काय घडलं. तुम्ही माझ्या कानात सांगितलं असतं ना अजित जरा उद्धवजींना सांग अडीच वर्ष झाली. आता मला द्या. तर मीच सांगून तुम्हाला आम्हीच तिथं बसवलं असतं. काही अडचणच आली नसती. काहीच अडचण आली नसती, असं अजित पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

गिरीशचं रडणं बंद होईना

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर सर्वाधिक दु:ख गिरीश महाजन यांना झाल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर कमालीचे वातावरण झाले होते. नेमका हा निर्णय झालाच कसा यामधून आणखी कोणी सावलेले नाहीत. महाराष्ट्रासाठी तो शॉक असला तरी यामधून गिरिश महाजन तर अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळेच डोक्याला बांधलेल्या फेट्यानेच ते डोळ्यातील पाणी पुसत आहेत, असं अजितदादा म्हणाले. हे सांगताना त्यांनी डोळे पुसण्याची अॅक्टिंगही करून दाखवली.

केसरकर चांगला प्रवक्ता, आम्ही शिकवलेलं…

आता आमच्याकडूनच गेलेली जास्त लोकं भाजपात दिसतात. समोर आमच्याकडचीच दिसतात. हे पाहून मला भाजपातील मूळ मान्यवरांचं वाईट वाटतं. पहिली लाईनच जरी तुम्ही पाहिली, तरी तुमच्या लक्षात येईल. दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झालेत, त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलेलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

जुन्याजाणत्यांची संधी हुकली

नार्वेकर हे भाजपमध्ये नवीन असूनही त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळाली. भाजपच्या नेत्यांना ही संधी मिळाली नाही. त्यावरून त्यांनी टोला लगावला. भाजपमध्ये अनेक जुनेजाणते नेते आहेत. आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि इतर नेत्यांना हे पद मिळेल असं वाटलं होतं. पण त्या सर्वांची संधी हुकली. भाजपमध्ये नवीन असूनही नार्वेकर यांनी करून दाखवलं, असा चिमटाही त्यांनी काढला.

जावयाने आमचा हट्ट पुरवावा

आम्ही जावई हट्ट पुरवत आलोय. आता त्याची तुम्हाला परत फेड करावी लागेल. आता आमचा हट्ट पुरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सासऱ्यांकडील लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी नार्वेकर यांना दिला.

नेतृत्वाच्या जवळ जातात

यावेळी त्यांनी नार्वेकर यांचं एक सिक्रेटही सांगून टाकलं. नार्वेकर जिथे जातात तिथल्या पक्षनेतृत्वाला ते आपलसं करून टाकतात. ते शिवसेनेत होते. तेव्हा आदित्य ठाकरेंना आपलसं केलं. त्यानंतर ते आमच्याकडे आले तर मलाही आपलसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी फडणवीसांना आपलसं करून घेतलं. आता ते शिंदे साहेब तुमचं काही खरं नाही, असं त्यांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उठला.

सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष

यावेळी त्यांनी सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांचं कौतुक केलं. दिग्गजांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी काम केलंय. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवळ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीही या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आताही उपाध्यक्ष म्हणून त्यांची तुम्हाला चांगली साथ मिळेल, असं ते म्हणाले.

राज्याचा विकास गतिमान होईल

यावेळी त्यांनी राज्याचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलंय. राहुल नार्वेकरांकडून सगळ्यांना न्याय मिळेल आणि विकासाचं चाकं अधिक गतीमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें