घर-दार विकलं, पूनम महाजन यांची संपत्ती 106 कोटींनी घटली!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:02 PM, 6 Apr 2019
घर-दार विकलं, पूनम महाजन यांची संपत्ती 106 कोटींनी घटली!

मुंबई: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान खासदार आणि उमेदवार पूनम महाजन यांनी आपला उमेदावरी अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. पूनम महाजन यांच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 98 टक्क्यांनी घट झाली आहे. आतापर्यंत अन्य उमेदावरांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये सर्वांच्या संपत्तीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र पूनम महाजन यांच्या संपत्तीचं विवरण आश्चर्यकारक आहे.

पूनम महाजन यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 98 टक्क्यांनी कपात झाली आहे. त्यांची संपत्ती 108 कोटींवरुन केवळ 2 कोटींवर आली आहे.

संपत्ती 106 कोटींची घट

पूनम महाजन यांनी 2014 मध्ये  दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पूनम आणि पती वी आर राव यांच्याकडे 108 कोटीची संपत्ती होती. आता 2019 मध्ये ही संपत्ती केवळ 2.21 कोटी रुपये इतकीच उरली आहे. यामध्ये रोख रक्कम, सोने, बँकातील बचत ठेवी यांचा समावेश आहे.  पूनम महाजन यांचा मुलगा आद्याजवळ 1.4 लाख रुपये, तर मुलगी अविकाकडे काहीही रक्कम नाही.

ना घर, ना जमीन

पूनम महाजन यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ना कृषी जमीन ना बिगर शेतकी जमीन आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडे स्वत:चं घरही नाही, तसंच व्यावसायिक इमारतही नाही.

2014 मधील संपत्ती

संपत्ती घटल्याबद्दल पूनम महाजन म्हणाल्या, “मागील निवडणुकीत जाहीर 108 कोटींच्या संपत्तीमध्ये देणेकरांचाच जास्त भाग होता. 2014 मध्ये 41.4 कोटी देणेबाकी होते. त्यामुळे देणी भागवून 2019 पर्यंत ही संपत्ती 2 कोटींवरच पोहोचली आहे”

कोट्यवधीचं कर्ज भागवण्यासाठी सर्वकाही विकलं

पूनम महाजन म्हणाल्या, “माझ्या पतीचा ऑटोमोबाईल डिलरशीपचा व्यवसाय होता. तो बंद पडला. आम्ही कोट्यवधीचे देणेबाकी होतो. त्यासाठी आम्हाला सर्वकाही विकावं लागलं. जे काही शिल्लक आहे ते जीवन विमाचे हप्ते आहेत”