बॅग तपासणीवरून नवा वाद; निवडणूक काळात नेते, स्टार प्रचारकांची झाडाझडती का घेतात? काय आहेत नियम?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हेलिकॉप्टर आणि बॅगांच्या तपासणीमुळे नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मविआकडून होत आहे. तर आमच्याही बॅगांची तपासणी झाली असून विरोधक फक्त राजकारण करत आहेत, असं भाजपने म्हटलंय.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘व्हीआयपी’ राजकीय नेत्यांच्या झाडाझडतीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाच्या आडून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तर निवडणूक आयोगाकडून आमच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली असून विरोधक फक्त राजकारण करत आहेत, असा प्रत्यारोप भाजपने केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नेतेमंडळींच्या बॅग तपासणी मोहीमेवरून नवा वाद सुरू झाला आहे. “माझी बॅग तपासली, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मात्र सर्वांना समान न्याय हवा. मोदी शहा यांचीही बॅग तपासली गेली पाहिजे”, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. लोकशाहीमध्ये समान न्याय हवा, पण दुर्दैवाने एकाच पक्षाच्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीने बॅग तपासणीचे अधिकार आयोगाला असतात का? त्यासाठी निवडणूक आयोगाची नियमावली नेमकी काय असते, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. ...
