जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या मदतीमुळे एका कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाले होते. याच कृतज्ञभावनेने मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 101 रुपयांची मदत पाठवली आहे.

जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट मिळाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या मदतीमुळे एका कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाले होते. याच कृतज्ञभावनेने मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 101 रुपयांची मदत पाठवली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार हा 5 वर्षीय बालक पित्ताशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पेलवणे पालकांना शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांच्या मदतीने त्यावर उपचार सुरु केले. मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागवणे अडचणीचे ठरु लागले. पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले.

या बालकाची आत्या रेणुका सुनील गोंधळी या नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता.नेवासा) येथे राहतात. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईल दूरध्वनी माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ एक लाख 90 हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदांतवर उपचार करणे शक्य झाले आणि त्याला जीवनदान मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवले.

“आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवत आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.” असे पत्र लिहीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाणिवेने लिहिलेले पत्र वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रूच तरळले. माझ्या जन्मदिनानिमित्त त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने शुभेच्छा प्राप्त झाल्या. मात्र, ज्या घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असतात. त्याच शेवटच्या घटकाचा प्रतिनिधी असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाकडून शुभेच्छा प्राप्त झाल्या. त्यासोबतच छोटीशी परंतु खूप मोलाची असणारी मदत आल्याचे पाहून मुख्यमंत्री भावूक झाले.

सहायता निधीला 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या

माझा वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याचा सन्मान राखत विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

दरम्यान, आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी संदेशाद्वारे तसेच दूरध्वनी करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, डॉ. हर्ष वर्धन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री मनिषा कोईराला, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच इतरही विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांसह इतरांनीही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

संबंधित बातम्या : 

खासदार नवनीत राणांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अनोखे गिफ्ट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *