मराठ्यांची क्रांती सेना 47 जागा लढवणार, फक्त ‘ही’ जागा सोडली!

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 15:14 PM, 25 Feb 2019
मराठ्यांची क्रांती सेना 47 जागा लढवणार, फक्त 'ही' जागा सोडली!

ठाणे : आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्याच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. राज्यातील प्रमुख पक्षांनी युत्या-आघाड्या केल्या असताना, मराठा आंदोलनातून जन्माला आलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेनेही लोकसभेच्या निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. मराठा मोर्चाचा प्रभाव पाहता, महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा लढण्याची घोषणा केल्याने, निवडणुकीची रंगत दुपटीने वाढली आहे.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 47 जागांवर महाराष्ट्र क्रांती सेना लढणार आहे. मात्र, महाराष्ट्र क्रांती सेनेने फक्त एका जागेवरुन निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देणार नसल्याचे महाराष्ट्र क्रांती सेनेने घोषित केले आहे. उदयनराजेंविरोधात आम्हाला लढायचं नाहीय, अशी भूमिका महाराष्ट्र क्रांती सेनेने मांडली.

महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र साळुंखे यांना उमेदवारीचीही घोषणा केली.

सातारा लोकसभा मतदारसंघ आणि उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले हे विद्यमान खासदार आहेत. उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून एकहाती जिंकतात. शिवाय, त्यांची लोकप्रियता अफाट आहे. सर्वसामान्य जनतेत मिसळणारा नेता आणि अडचणींच्या काळात धावून येणारा नेता म्हणूनही उदयनराजेंची ख्याती आहे.

हे वाचाच, उदयनराजेंचा तुम्हालाही अभिमान वाटेल!

उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. मराठा मोर्चावेळी त्यांनी उघडपणे आणि प्रसंगी मोर्चात सक्रीय सहभाग घेत पाठिंबा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उदयनराजे भोसले कायम आग्रही राहिले.