नांदेडचा आढावा : जुना गड काँग्रेस कसा वाचवणार?

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस - 3 , शिवसेना - 4 , राष्ट्रवादी - 1 , भाजप - 1 असं चित्र आहे.

नांदेडचा आढावा : जुना गड काँग्रेस कसा वाचवणार?
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 5:07 PM

 नांदेड :  राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस – 3 , शिवसेना – 4 , राष्ट्रवादी – 1 , भाजप – 1 असं चित्र आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड अशी नांदेडची ओळख होती, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आणि लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील भाजपकडून खासदार झाले. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजपची हीच विजयी घोडदौड कायम राहील का याची साशंकता आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे नांदेडमध्ये विधानसभा निवडणूक अशोक चव्हाण, प्रताप पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती केंद्रीत राहणार आहे.

लोकसभेच्या वेळी थेट राष्ट्रवादावर मतदान झालं आणि लोकांनी फिर एक बार मोदी म्हणत सेना भाजपाला मतदान केले. मात्र आता विधानसभा निवडणुकीतील मुद्दे पूर्णपणे वेगळे आहेत. सेना भाजपने नांदेडला विकासाच्या बाबत सावत्र वागणूक दिली असा आरोप काँग्रेसकडून अनेकदा झाला. हा आरोप खोडून काढण्यासारखं काम युती सरकारने केलं नाही. त्यामुळे युतीसाठी नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरण आहे असं चित्र आजघडीला तरी नाही. काँग्रेसची देखील परीस्थीती फारशी समाधानकारक नाही. स्व:त अशोक चव्हाण हे आपल्या भोकर मतदारसंघातच पूर्णवेळ व्यस्त आहेत, त्यांनी तिथच गुंतून राहावं यासाठी भाजपने निवडणुकीसाठी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना पुढे केलं आहे. त्यामुळे चव्हाण आतापासूनच भोकरमध्ये अडकून पडले आहेत.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेस – 3 , शिवसेना – 4 , राष्ट्रवादी – 1 , भाजप – 1 असं चित्र होतं. त्यापैकी शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील आता हिंगोलीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर तत्कालिन सेनेचे लोहा कंधारचे आमदार असलेले प्रताप पाटील आता नांदेडचे भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

सद्य राजकीय परिस्थिती पाहता 9 विधानसभा असलेल्या नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा सत्तेत प्रवेश झाला तर नवल नाही. वंचित आघाडीकडे सक्षम उमेदवार उपलब्ध झाले तर नांदेड हे वंचितच्या सत्तेचे प्रवेशद्वार होऊ शकते. सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळीत कायम अग्रेसर राहिलेल्या नांदेड जिल्ह्याला नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्याची परंपरा आहे.

यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी राज्यात भारीप बहुजन महासंघाच्या नावाखाली निवडणुका लढवल्या होत्या, त्यावेळी नांदेडच्या किनवट मतदारसंघामधून 1993 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भीमराव केराम हे विजयी झाले होते. महाराष्ट्रात ज्यावेळी एमआयएमचे नावही कुणाला माहित नव्हतं त्या एमआयएमचे नांदेड महापालिकेत 13 नगरसेवक निवडून देण्याचा विक्रम नांदेडकरांच्या नावे आहे.

त्यामुळे यावेळची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने प्रस्थापितांसाठी अडचणीची ठरणरी आहे. त्यातच यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. खरीप हंगाम धोक्यात आलाय, रब्बी येण्याची आशा मंदावलीय. पिकविमा, कर्जमाफी याचाही गोंधळ अद्याप कायमच आहे. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या या जिल्ह्यात इथल्या नेत्यांना उद्योगधंदे उभे करताच आले नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी पुण्या-मुंबई शिवाय पर्याय नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे जो काही व्यापार होता तोही ढेपाळलाय. अशा स्थितीत येणारी विधानसभा निवडणूक महत्वाची मानली जातेय. त्यातच मतदारांसमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने मतदार काय कौल देतील यावर सर्व चित्र अवलंबून आहे.

नांदेड जिल्ह्यातील विधानसभानिहाय आढावा –

 1}  नायगाव विधानसभा

2009 मध्ये  नायगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात अपक्ष अशी लढत झाली होती. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर असलेले आणि अपक्ष म्हणून उभे राहिलेले वसंत चव्हाण विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बापूसाहेब गोरठेकर यांना 11 हजार मतांनी पराभूत करत चव्हाण विजयी झाले. जवळपास तितक्याच फरकाने 2014 साली झालेल्या निवडणुकीत वसंतराव यांनी भाजपच्या राजेश पवार यांचा पराभव केला आणि दुस-यांदा ते विजयी झाले. मात्र आता या मतदारसंघातील चित्र बदललं आहे. स्व:त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडला आहे. बापूसाहेब गोरठेकर आता भाजप समर्थक बनले आहेत. त्याचा फायदा नायगाव विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला होऊ शकतो, त्यामुळे आता इथून भाजपच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे.

आमदार म्हणून वसंतराव चव्हाण यांनी दहा वर्षाच्या काळात प्रभावीपणे काम केलय. मतदारसंघातील रस्त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. जनसेवेसाठी सगळं चव्हाण कुटुंब कायम तत्पर असतं, म्हणूनच जिल्ह्यात चव्हाण लोकप्रिय आमदारांपैकी एक आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून त्यांच्या नावाचा विचार झाला होता, यावरुन त्यांची लोकप्रियता लक्षात येईल.

नायगाव मधल्या ग्राम पंचायंतीच्या जागेच्या विक्रीचा वाद सोडला तर चव्हाण यांच्यावर गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे कोणतेही गंभीर आरोप झाले नाहीत. त्यामुळे वसंतराव पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाला 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नवचैतन्य पसरलेल आहे.

इथून भाजपकडून बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, मिनल खतगावकर, माणिक लोहगावे यांच्यासह पुन्हा एकदा राजेश पवार उत्सुक आहेत. स्थानिक उमेदवार द्यावा असा इथल्या जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. भाजपनेते भास्करराव पाटील खतगांवकर आपल्या सूनबाईच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र इथ खतगांवकर की राजेश पवार याबाबत अंतिम क्षणी निर्णय अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यापैकी काहीनी भाजपची उमेदवारी नाही मिळाली तर वंचित आघाडीकडे जाण्याची तयारी केलीय. नायगाव विधानसभा मतदार संघ हा उमरी, धर्माबाद आणि नायगाव अश्या तीन तालुक्यात विखुरलेला आहे.

मराठा मातंग, लिंगायत आणि धनगर समाजाची मते इथ निर्णायक संख्येने आहेत, त्यामुळे काँग्रेस- भाजपच्या मता विभाजनात वंचित आघाडीला फायदा होऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरुन वंचित आघाडी कडुन इथ उत्तम गवाले, आनंद रोहरे, भास्कर भिलवंडे, शिवाजी कागदे यांनी उमेदवारी मागीतलीय. शिवसेने कडुन गंगाधर बडूरे, रवींद्र भिलवंडे आणि माधव कल्याण हेही निवडणुक मैदानात उतरण्यास तयार आहेत. बापुसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्यामूळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसच अस्तीत्व राहिलेलं नाही. या स्थितीत वसंतराव चव्हाण तिस-यांदा निवडून येतात का ते पाहण रंजक ठरणार आहे.

नायगावच्या समस्या 

गोदावरी नदी वाहणा-या या मतदारसंघात रेती माफीयानी थैमान घातलय. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची चाळणी झालीय. रेती माफीयांना मिळणा-या राजकीय पाठबळामूळे हा मतदारसंघ म्हणजे रेती माफीयांचा अड्डा बनलाय. रेतीच्या अजस्त्र वाहनामुळे अनेक गावांना जाणारे रस्ते जिवघेणे बनले आहेत. तर काही गावांना जायला साधे रस्तेही उपलब्ध नाहीत. या मतदारसंघात सिंचनाच्या सोयी गेल्या पंधरा वर्षात फारश्या वाढल्याच नाहीत. त्यामुळे “गंगाथडीला” सुकाळ आणि अन्यत्र कायम दुष्काळ अशी स्थिती या मतदारसंघात आहे. कृष्णुर इथं नावालाच पंचतारांकीत औद्योगीक वसाहत आहे, पण या वसाहतीत फारसे उद्योग अद्याप आलेच नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही या तालुक्याची बेरोजगारीची समस्या कायमच आहे. या मतदारसंघातील अनेक बेकार पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्ष हैद्राबादला जात असतात.

2] मुखेड विधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघात भाजपचे तुषार राठोड विद्यमान आमदार आहेत.

दिवाळी झाली की भकास होणारी गावे पाहायची असतील तर मुखेड तालुक्यात या. दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतरण करण हे या तालुक्याची मजबुरी आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघात एकही मोठा रोजगार नाही, कुठलही धरण नाही, त्यामूळे केवळ खरीप हंगामापुरती शेती इथ होते. डोंगराळ असलेल्या या तालुक्यावर कायम वरुणराजाही रुसलेला असतो. त्यामूळे नांदेड जिल्ह्यात सर्वाधीक पाणीटंचाईचा तालुका अशीही या तालुक्याची ओळख आहे.

या मतदारसंघात लेंडी प्रकल्प विस वर्ष झाली रखडलाय. हा प्रकल्प जर पूर्ण झाला असता तर कदाचीत या तालुक्यात हरीतक्रांती झाली असती, पण या प्रकल्पाकडे कुणीही गांभीर्याने पाहील नाही. मुखेड मध्ये भाजपचे डॉ तुषार राठोड हे आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार तुषार राठोड यांचे वडील स्वर्गीय गोविंद मामा राठोड हे ७३ हजार २९१ मतांनी विजयी झाले पण आमदारकीचा शपथविधी होण्यापूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीत गोविंद मामा राठोड यांचे चिरंजीव डॉ तुषार राठोड हे ४७ हजार २४८ मतांनी विजयी झाले. खरंतर गोविंद मामा राठोड यांच्या निधनानंतर तुषार राठोड यांच्याबद्दल मतदारांना सहानुभूती होती पण प्रत्यक्ष मतदानात तुषार राठोड याना त्यांच्या वडिलांपेक्षा २६ हजार ४३ मते कमी पडली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी भाजपला सुमारे २० हजारांचे मताधिक्य दिलं. इथ भाजपकडून विद्यमान आमदार तुषार राठोड, हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, व्यंकट पाटील गोजेगावकर इच्छुक आहेत.

विद्यमान आमदाराची उमेदवारी रद्द होऊन आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा या मंडळींना आहे, त्यातूनच या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. आमदार तुषार राठोड यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ फारसा प्रभावकारक राहिला नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी काहीही भरीव केल नाही, त्यातुन पक्षातही त्यांच्या बाबत फारसं चांगलं मत नाही. त्यामुळे भाजपच्याच उमेदवारीसाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.

हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मुखेड मध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे. ते भाजप कडून विधानसभा लढवण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येतेय. मुखेड विधानसभा मतदारसंघात लिंगायत मतदार हा संख्येने दुसरा मोठा मतदार आहे. त्यामुळेच रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा वाढलीय. रामदास पाटील याच भागातील मूळ रहिवासी असल्याने त्यांना समर्थन ही मिळत आहे. पाटील यांचा लोकसंग्रह दांडगा असल्याने त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते विजयी होतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. रामदास पाटील यांच्यासाठी युवकांची एक मोठी फळी कामाला लागलीय. त्यामुळे रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या मुखेड तालुक्यात सुरु झाली आहे.

२००९ साली राखीव असलेला हा मुखेड मतदारसंघ खुला झाला आणि काँग्रेसचे हनुमंत पाटील हे विजयी झाले. केवळ १ हजार २१६ मतांच्या फरकाने हनुमंत पाटील हे त्यावेळी विजयी झाले. २००९ साली राज्याचे मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाण यांच्याकडे होते त्यामुळे हनुमंत पाटील ही त्या लाटेत निवडून आले, त्यानंतर याच हनुमंत पाटील यांचे बंधू असलेल्या दिलीप पाटील यांना जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. दोन मोठी पदे एकाच घरात देऊनही मुखेडमध्ये कवडीचाही बदल झाला नाही. शिवाय दोन्ही बंधूंचे व्हायरल झालेले फोनचे रेकोर्डिंग लोक विसरलेले नाहीत.

शिवाय , काँग्रेस नेतृत्वदेखील या राजबंधूवर नाराज असल्याचे कळते. काँग्रेसकडून स्वप्नील चव्हाण हे देखील उमेदवारीच्या स्पर्धेत अग्रक्रमी आहेत. स्वप्नील यांच काम चांगल आहे, जिल्हा परीषदेच्या माध्यमातून त्यानी लोक जोडण्याच काम केलय. पाणी टंचाईच्या काळात त्यांनी मतदारसंघाला पदरमोड करत पाणी पुरवल, शिवाय स्वप्नीलची समाजात चांगली प्रतीमा आहे. त्यामुळे स्वप्नील चव्हाण च्या नावाचा काँग्रेस विचार करु शकते. स्वप्नील चव्हाण यांच्या बंजारा समाजाची निर्णायक मते मुखेडमध्ये आहेत, त्यामुळे स्वप्नील हेच काँग्रेसचे उमेदवार असतील अस सध्या तरी चित्र आहे. चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर स्व:तच्या एकगठ्ठा मतदानावर ते चमत्कार करु शकतात.तर मुखेडमधून वंचित आघाडी तर्फे यशपाल भिंगे, संभाजी मुकनर यांच्यासह डॉक्टर सुभेदार यांचे नाव चर्चेत आहेत.

  3] लोहा/ कंधार विधानसभा

स्वातंत्रानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई या मतदारसंघात होत असे. एकेकाळी विधानभवन गाजऊन सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.

2004 साली या मतदारसंघात अपक्ष म्हणून प्रताप पाटील हे पहिल्यांदा निवडुन आले होते, तिथुन प्रताप पाटील यांच्या राजकिय कारकिर्दीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे हे विजयी झाले होते. धोंडगे यांनी प्रताप पाटील यांचा केवळ नऊ हजार मताने पराभव केला होता. त्या नंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडुन प्रताप पाटील आणि भाजप कडुन मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते.

यावेळी 45 हजाराचा मताधिक्य घेत प्रताप पाटील विजयी झाले होते. विशेष म्हनजे हा विधानसभा मतदारसंघ लातुर लोकसभेत येतो, आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथुन भाजपला मताधीक्य मिळालय. तर लोहा कंधारचे आमदार असलेले प्रताप पाटील हे नांदेडचे खासदार म्हणून निवडुन आले आहेत. त्यामुळे आता लोहा कंधार विधानसभेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याच लक्ष लागलय.

लोहा कंधार मध्ये भाजपने प्रताप पाटील यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. भाजपकडुन इथ श्यामसुंदर शिंदे, प्रनीता देवरे यांचीही नावे चर्चेत आहेत. तर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने मुक्तेश्वर धोंडगे यांची उमेदवारी कायम मानल्या जातेय. शिक्षण संस्थांच मोठ जाळे असणा-या मुक्तेश्वर धोंडगे कडे मनुष्यबळ भरपुर आहे, पण त्याचा वापरच त्यांना करता आला नाही, त्यामुळे ते आजवर अयशस्वी झालेत. यावेळेला त्यांनीही कंबर कसलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडुन उमेदवारी गृहीत धरुन शंकरअण्णा धोंडगे कामाला लागले आहेत, पुर्ण मतदारसंघ शंकर अण्णानी पिंजुन काढलाय.

शेतकरी चळवळीतील एक धाडसी कार्यकर्ता म्हणून शंकर अण्णांना मतदारसंघात सहानुभुती असते, मात्र ही सहानुभुती मतांत परावर्तीत करण गरजेचे आहे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात लक्ष घातल पाहीजे, मात्र तस होताना सध्या तरी दिसत नाहीये. काँग्रेसकडुन रोहीदास चह्वाण, अनील मोरे, बालाजी पांडागळे, संजय भोशीकर यांची नाव चर्चेत आहेत. तर शेकापकडुन पुरुषोत्तम धोंडगे हे ही नशीब अजमावणार आहेत .वंचित आघाडी कडुन संजय बालाघाटे, शिवा नरंगले, विनोद पापिनवार,  यांची नाव चर्चेत आहेत. शिवसेनेचे नेते तथा लिंगायत समाजाचे बडे प्रस्थ असलेले प्रा. मनोहर धोंडे हे देखील इथुन निवडणूक मैदानात उतरु शकतात, शिवा संघटनेच्या माध्यमांतुन त्यांच मोठ संघटन लोहा कंधार तालुक्यात आहे, त्यामुळे मनोहर धोंडे यांची भुमीका देखील महत्वपुर्ण आहे.

 लोहा कंधारच्या समस्या

कायम दुष्काळी असलेला हा नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अपुरे पर्जन्यमान होते त्यामुळे इथल्या शेतक-यांचे नेहमीच हाल होत असतात. मात्र मानार प्रकल्पामुळे काही अंशी इथली सिंचनाची समस्या सुटण्यास मदत झालीय. सध्या मतदारसंघात रस्त्यांचे रुंदीकरण मोठ्या प्रमानात होतेय, नागपुर – तुळजापुर हा राष्ट्रीय महामार्ग इथुन जात असल्याने दळनवळनाच्या सुवीधा वाढतील अशी अपेक्षा आहे. आरोग्य, शिक्षनाच्या बाबतीत मात्र इथ मुलभुत सुवीधांचा अभाव आहे.  उद्योगधंदे ही या दोन्ही तालुक्यात रुजलेच नाहीत, त्यामुळे शेती हा एकच प्रमुख व्यवसाय इथ आहे.

या शेताला लागणा-या पाण्यासाठी नव्याने सिंचन प्रकल्प मंजुर करुन घेण्यात प्रताप पाटील यांना यश आलय. त्यामुळे प्रताप पाटील खासदार बनले असले तरी इथले मतदार त्यांच्यावरचा हक्क सोडायला तयार नाहीयेत, त्यातुन या मतदार संघात भाजपची विजयी घौडदौड रोकण्यासाठी विरोधकांना कंबर कसावी लागणार आहे. पण इथले विरोधक विखुरलेले असल्यामुळे भाजपसाठी सध्या तरी हा मतदारसंघ सुरक्षीत मानल्या जातोय, आगामी रणधुमाळीत इथ काय काय होईल त्याचा अंदाज बांधण अवघड आहे. कारण मन्याडखोरचे मतदार नेहमीच वेगळाच पराक्रम करत असतात.

   4]  भोकर विधानसभा मतदारसंघ

स्वर्गीय शंकरराव चह्वाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. 2009 साली झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख विस हजारापेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमीता चव्हाण इथुन निवडणुकीत उभ्या होत्या, मात्र यावेळेला त्यांच मताधिक्य विस हजाराने घटल होत. या दरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते, त्यामुळे भोकर मतदारसंघात विकासाची गंगा यायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात तस काही घडल नाही. काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष या काळात अशोक चव्हाण यांच्याकडे होत, त्यामुळे त्यांना भोकरकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळालाच नाही. या सर्व घडामोडीत भोकरमध्ये अनेक स्वयंघोषीत कारभारी तयार झाले. या कारभा-यांनी मतदारसंघातील समस्या नेतृत्वाकडे जाऊच दिल्या नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.

भोकर तालुका एकेकाळी सिंचनाने सम्रुद्ध होता, इसापुर धरणाच्या पाण्यावर इथले शेतकरी ऊस , केळी आणि हळद असे नगदी पिक घेत असत. मात्र पैंनगंगा नदीवर इसापुर धरणाच्या वरच्या बाजुला अनेक बंधारे झालेयत, त्यामुळे गेल्या चार वर्षापासुन इथल सिंचन जवळपास खुंटलय. सुधा प्रकल्पाचा अद्याप देखील साधा विस्तार ही होऊ शकलेला नाही. त्या शिवाय भोकर मतदारसंघात सिंचनाच्या काही वेगळ्या सोयी इथल्या नेतृत्वाने तयार केल्याच नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ आता भकास होत चाललाय. अर्धापुरी केळीसाठी प्रसीद्ध असलेली केळी आता नामशेष होते कि काय अशी भिती निर्माण झालीय.

केळीवर प्रक्रिया करणा-या उद्योगाची नुसतीच चर्चा होते मात्र प्रत्यक्षात तिथ काहीही घडलेल नाही. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री देखील राहीलेल्या अशोक चव्हाण यांनी भोकरमध्ये कोणतेच उद्योग आणले नाहीत, त्यामुळे बेकारी इथली ही कायमची समस्या आहे. त्याच बरोबर या मतदारसंघातील अंतर्गत रस्त्याच्या बाबतीत बोंबाबोंबच आहे. गेल्या काही दिवसात या मतदार संघातील अनेक स्थानीक स्वराज संस्थामध्ये काँग्रेसने अपहार केल्याचे आरोप गाजले, अश्या स्थीतीत काँग्रेस नेतृत्वाला हि जागा राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

भोकरमध्ये यावेळी काँग्रेसकडुन अशोक चव्हाण स्व:त उमेदवार असणार आहेत. त्यामुळे सध्या अशोक चव्हाण पुर्णवेळ भोकरच्या मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यांना भोकरमध्येच गुंतऊन ठेवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी खेळलीय. भोकर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पुढा-यांनी पक्षाला रामराम करत खासदार प्रताप पाटील यांची गळाभेट घेतलीय. भाजपकडुन इथ राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर निवडणुक रिंगणात उतरणार आहेत. बापुसाहेब गोरठेकर यांना धर्मराज देशमुख, किशोर देशमुख यांच्यासह अनेक जनाधार असलेल्या नेत्यांचे पाठबळ मिळत आहे.

भोकर, अर्धापुर आणि मुदखेडचे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर देखील स्वत : भोकरकडे विशेष लक्ष ठेऊन आहेत, त्यामुळे भोकरची लढाई अशोक चह्वाण यांच्यासाठी सोप्पी नाहीये. भोकरमधुन भाजपकडुन बापुसाहेब गोरठेकर, नागनाथ घिसेवाड, सुरेश राठोड, प्रविण गायकवाड, राम चौधरी आदी उत्सुक आहेत. शिवसेनेकडुन उत्तम जाधव, धनराज पवार, बबन बारसे यांनीही उमेदवारी मागीतलीय. तर वंचित आघाडीकडुन नामदेव आयलवाड, केशव मुद्देवाड सह अन्य काही जण उत्सुक आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीची विधानसभेत पुनरावृती होईल अशी आशा भाजपाला आहे. तर साखर कारखान्याच्या बळावर आणि वैयक्तीक अशोक चह्वाण यांच्याप्रती असलेल्या प्रेमावर काँग्रेसची भिस्त अवंलबून आहे. ————————————————————————–

  5] नांदेड उत्तर 

प्रकाश खेडकर यांच्या अकाली निधनानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला तगडा विरोधक असा आमदार मिळालाच नाही. खेडकर यांच्या अकाली निधनानंतर 2004 साली झालेल्या निवडणुकीत प्रकाश खेडकर यांच्या पत्नी अनुसया खेडकर प्रचंड मतानी निवडुन आल्या होत्या. मात्र त्यानंतर अशोक चह्वाण यांच्या प्रभावाखाली जिल्हा आला. 2009 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या डी पी सावंत यांना लोकांनी निवडुन दिल, 2014 साली ही अवघ्या काही मताने डी पी सावंत पुन्हा निवडुन आले. मात्र गेल्या दहा वर्षाच्या काळात डी पी सावंत आमदार म्हणून फारसा प्रभाव पाडु शकले नाही. अशोकरावांचे मित्र इतकीच काय ती त्यांची ओळख आहे, स्व:त च्या कार्यशैलीतुन एक राजकारणी अशी त्यांची प्रतीमा त्यांना बनवताच आली नाही. प्रचंड विस्तार होत असलेल्या नांदेड उत्तर मतदारसंघात सावंत यांनी लोक जोडण्याचे काम केल. पण ग्रामीण भागात आपल्या समर्थकांची फळी बनवण्यात ते अपयशी ठरले. कुणाच्या अधे मधे न जाता शांतपणे साहेबांच्या मागे राहण हीच त्यांची जमेची बाजु…पण या एकाच बाजुवर आता नांदेडमध्ये राजकारण करण अवघड बनलय.

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघ म्हणजे स्व्त: अशोकराव राहतात तो परीसर, सोबतीला तरोडा, पासदगाव आणि लिंबगावचा परीसर मिळुन बनलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लीम निर्णायक संख्येने आहेत. नांदेड दक्षीण मतदारसंघाप्रमाणेच इथेही सारख्याच समस्या आहेत. दक्षीण च्या तुलनेत उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विस्तार झपाट्याने होतोय. नवीन घर बांधुन राहणा-यांची संख्या या मतदारसंघात सर्वाधीक आहे. त्यामुळे पाणी टंचाईची तिव्रता या भागात सर्वाधीक आहे, गोदावरी नदीची उपनदी असणारी आसना या मतदारसंघातुन वाहते, शहराच्या शेजारी एखादा प्रकल्प या नदीवर उभारला तर शहराच्या पाण्याची गरज भासु शकते. मात्र पाणी टंचाईच्या या भिषण समस्येकडे कुणाचेही लक्ष नाहीय. उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची चाळनी झालेली आहे, इथली दारुची दुकाने वाचवण्यासाठी इथल्या नेतृत्वाने अनेक रस्ते हस्तांतरीत केलीयत, त्यामुळे रस्त्याची साधी दुरुस्ती देखील शक्य होत नाहीये.

या मतदारसंघात निवडणुक लढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडुन इच्छुकांची संख्या सर्वाधीक आहे. भाजपकडुन इथ तर इच्छुकांची रांगच लागलीय. आरती पुरंदरे, ओमप्रकाश पोकर्णा, बालाजी शिंदे, प्रवीण साले, बंडु पावडे, सुधाकर पांढरे, भगवान आलेगावकर, मिलिंद देशमुख आदी नेत्यांनी या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कदम, शिला कदम यांनी आपली भुमीका उघड केली नसली तरी हे दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे इथ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल की नाही याची शंका आहे. तर शिवसेनेकडुन माधव पावडे, दत्ता कोकाटे, जयंत कदम, बालाजी कल्याणकर यांनीही उमेदवारी मागीतली. तर वंचित आघाडी कडून बालाजी इबीतदार, बाळासाहेब देशमुख उस्तुक आहेत. मात्र स्व:त प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी इथुन निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे वंचितच्या उमेदवारीवर इथल्या निवडणुकीच चित्र स्पष्ठ होणार आहे.

—————————————————————————————————-   6} नांदेड दक्षिण 

2009 ला अस्तीत्वात आलेला नांदेड मधला हा मतदारसंघ….या मतदार संघात 2009 साली काँग्रेसकडुन ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी दुस-या क्रमांकांची मते घेतली होती. त्याच हेमंत पाटील यांनी 2014 साली अगदी थोड्या फरकाने ही जागा जिंकली. भाजपच्या दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव करत हेमंत पाटिल विधानसभेत पोहोचले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधुन निवडणूक लढवली आणि ते विजयी ही झाले. त्यामुळे नांदेड दक्षीण मधुन हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील ह्या शिवसेनेच्या उमेदवार असतील असा कयास आहे.

नांदेड दक्षीण हा मतदारसंघ म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको – हडको आणि सोनखेडचा काही भाग मिळून बनलेला आहे. या मतदारसंघात मुस्लीम, मराठा आणि दलीत मतदार निर्णायक संख्येने आहेत. त्यामुळे वंचित आघाडीकडुन लढण्यासाठी इथ अनेकजण उत्सुक आहेत. त्यात प्रामुख्याने फेरोज लााला, फारुख अहेमद, मकबुल सलीम , हबीब बावेजा यांचा समावेश आहे. तर सय्यद मोईन हे एमआयएम मध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा आहे, मोईन जर एमआयएम मध्ये आले तर पुर्ण दक्षीण विधानसभा मतदारसंघाच चित्रच बदलु शकते. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातुन भाजपसचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे इथुन भाजपकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या सर्वाधीक आहे. भाजपकडुन संतुक हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, प्रणीता देवरे आदी नाव चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडुन उमेदवारीसाठी अब्दुल सत्तार, अब्दुल शमीम, नरेंद्र चह्वाण यांनीही दावेदारी केलीय. सर्वाधीक उमेदवार कायम या मतदारसंघात असतात, त्यामुळे इथली लढाई रंजक असते.

शेतक-याला सिंचनासाठी पाणी द्यावे म्हणून आपल्या काळात आमदार हेमंत पाटील यांनी मोठी मेहनत घेतली. या मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आताही हिंगोलीचे खासदार झाले तरी ते इकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे शिवसेनेकडुन ही जागा हिसकावण्यासाठी विरोधकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळाची छाप टाकण्याच काम या मतदारसंघात केल, मात्र या मतदारसंघातील समस्या अद्यापही कायम आहेत. नांदेड महानगरपालीका कोंग्रेसच्या ताब्यात आहे, मात्र नांदेडचे अंतर्गत रस्ते हे एखाद्या खेड्याला लाजवतील असे आहेत.

अपु-या पावसामुळे शहरात पाणी टंचाई आहे, त्याला सर्वस्वी मनपा जवाबदार आहे, पण त्याचा रोष आमदार- खासदारावर जातोय. उद्योग धंद्याच्या बाबतीत नांदेड कपाळ करंटेच आहे. एकेकाळी नांदेडच वैभव असणारी टेक्सटाईल मिल अद्याप बंदच आहे. इतरही छोटे मोठे उद्योग बंद पडलेले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत नांदेड सुधारल असल तरी इथल्या बेकारांच्या हाथाला कामासाठी पुणे मुंबईच गाठाव लागते. रोज पन्नासहुन अधीक खाजगी बसेस पुण्याला येजा करतात यावरुन या स्थितीचा अंदाज येईल. इतक्या वर्षात साधी धवलक्रांती ही इथ होऊ शकलेली नाही, साध्या दुधाच्या बाबतीत नांदेडकर सोलापुर नगर वर अवलंबुन आहेत. पर्यावरण मंत्र्याकडे नांदेडच पालकत्व असुनही गोदावरी नदीच प्रदुषण तसुभरही कमी झालेल नाही. समस्याच माहेरघर म्हणजे नांदेड शहर आहे, आणि इथले लोक कमालीचे सोशक बनल्यामुळे किमान मतदानातुन चमत्कार होईल अशी आशा आहे.

————————————————————————-

 7] देगलूर विधानसभा मतदारसंघ

अनुसुचीत जातीसाठी प्रवर्गासाठी आरक्षित असलेला हा मतदारसंघ आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेला मतदार संघ आहे. सुभाष साबणे हे २०१४ च्या निवडणुकीत केवळ ८ हजार ६४८ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचा पराभव करत साबने आमदार झाले. साधी राहणी आणि लोकांशी मोठा संपर्क ही आमदार साबणे यांची ओळख आहे. आपण भल आणि आपला मतदारसंघ भला अशी साबणे यांची शैली आहे, त्यामुळे त्यांचे वैयक्तीक विरोधक फारसे नाहीत. त्यामुळेच मुखेड्कर असलेले साबणे देगलुर मधुन निवडुन येऊ शकले होते. विशेष म्हनजे मराठवाड्यातील शिवसेनेचे ते ज्येष्ठ आमदार आहेत, त्यामुळे आता निवडुन आले तर त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. मात्र आता 2019 च्या निवडणुकीत साबणे पुन्हा निवडुन येतील का हा खरा प्रश्न आहे.

बिलोली देगलुरच्या समस्या:

तालुक्यात मांजरा आणि लेंडी अश्या दोन प्रमुख नद्या आहेत, मात्र सिंचनाच प्रमान अत्यल्प आहे. सिंचन प्रकल्प नव्याने नसल्याने सिंचनात वाढ झालेली नाही. केवळ नदी काठच्या गावातील शेती सिंचनाखाली आहे. नव्याने जलप्रकल्प या दोन्ही तालुक्यात निर्माण झालेच नाही. उद्योगधंदे नसल्यामुळे इथल्या मतदारांना जवळच्या हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय नाहीये. या तालुक्यातील नदी पात्रात लाल रंगाची रेती आहे, या लाल रेतीला आंध्र कर्नाटकमध्ये मोठी मागणी आहे.

त्यामुळे या नदीपात्रातुन जागोजागी रेतीची तस्करी केल्या जाते. रेतीच्या उलाढालीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. मात्र सरकारच्या तिजोरीत नगण्यच रक्कम जाते. रेती तस्कर फोफावल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दैना झालीय. मात्र यावर कोणतेही राज्यकर्ते साध बोलतही नाहीत. देगलुर- बिलोली तालुक्यातील नदी काठच्या गावांना चांगल्या रस्त्याच सुख अद्यापही मिळालेल नाही. रेती तस्कर दादागीरी करत गावक-यांना बोलुही देत नाहीत. तस्करांच्या या गुंडागर्दीला राजकीय पक्षांच पाठबळ मिळत असत त्यामुळे रेती माफीयांच्या दहशतीत हा मतदार संघ आहे.

मुख्य लढत : 

शिवसेनेकडे असलेल्या या मतदार संघात काँग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष आहे. काँग्रेस कडून यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतारपूरकर, वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजय वरवंटकर, गृह खात्यातून निवृत्त झालेले भी ना गायकवाड हे तिघे जण उत्सुक आहेत. त्यापैकी वरवंटकर हे काँग्रेसची उमेदवारी पक्की समजून कामाला लागले आहेत.

वरवंटकर यांच्या अनेक जमेच्या बाजु आहेत, शिवाय त्यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे, अश्या स्थीतीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी असा स्थानीकांचा आग्रह आहे. दुसरीकडे काँग्रेसचेच गायकवाड हे देखील मतदारसंघात भेटीगाठी घेतायत.तर भाजपने इथे २०१४ साली उद्योजक भीमराव क्षीरसागर याना उमेदवारी दिली होती, पण ते तिस-या क्रमांकावर फेकल्या गेले होते. स्थानीक पातळीवरच्या राजकारणाने त्यांना वेळेवर धोका दिला, त्यामुळे यावेळीही क्षीरसागर हे पुन्हा इच्छुक दिसत आहेत, त्यांनी उमेदवारी साठी तयारी सुरु केलीय. तर राष्ट्रवादीतून भाजप मध्ये आलेले मारोती वाडेकर यांनीही भाजपकडे उमेदवारी मागीतली.

मारोती वाडेकर हे अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांना उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात चमत्कार होईल असा अंदाज आहे. या शिवाय.धोंडिबा मिस्त्री यांचही नाव भाजपा कडुन चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देगलूर विधानसभा मतदासंघातून भाजपला २३ हजार मतांची आघाडी मिळाली होती…पण हि आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत टिकेल का हा खरा प्रश्न आहे, त्यावरच विद्यमान आमदाराचे भवीतव्य अवंलबुन आहे. वंचित आघाडी साठी हा मतदारसंघ चांगलाच पोषक आहे, इथुन वंचित कडुन उत्तम इंगोले, उत्तमकुमार कांबळे, मिलिंद शिकारे, गुंडेराव गायकवाड यांनी उमेदवारी मागीतली आहे.


8] हदगाव विधानसभा मतदारसंघ

2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसकडुन हा मतदारसंघ हिसकाऊन घेतला होता. शिवसेनेच्या नागेश पाटील आष्ठीकर यांनी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांचा पराभव केला. तरुण तडफदार असलेल्या नागेश पाटील यांनी आमदारकीची सुत्रे घेतली. सुभाष वानखेडे यांच्या नंतर नागेश पाटील हे हदगावचे शिवसेनेचे दुसरे आमदार बनले. मात्र 2014 साली भाजपमध्ये गेलेले वानखेडे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये पोहोचले. त्यामुळे हदगाव विधानसभेच्या निवडणुकीत आता रंगत येईल असं चित्र आहे.

विद्यमान आमदार नागेश पाटील यांच्या उमेद्वारीला शिवसेनेच्या बाबुराव कदम यांनी विरोध करत स्वत: साठी उमेदवारी मागीतलीय. दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या माधवराव पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधल्या गंगाधर पाटील चाभरेकर यांनी विरोध करत स्व:त उमेदवारी मागीतलीय. तर माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि मुलुख मैदानी तोफ राहीलेल्या सुर्यकांता पाटील देखील भाजपकडुन उमेदवारी साठी तयार आहेत. तगड्या उमेदवाराच्या शक्यतेमुळे आमदार नागेश पाटील आपला गड कसा राखतात याकडे हदगाव हिमायतनगर तालुक्याच लक्ष लागलय.

मुळात अठरा पगड जातीचा भरणा असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा इथ उमेदवार कोण असेल त्यावर निवडणुकीच गांभीर्य अवंलबुन राहणार आहे. तर वंचित आघाडीकडुन इथे बापुराव वाकोडे, किशन पोले, सुदर्शन भारती, मनोज राऊत, बी डी चह्वाण, उत्तम शिंदे, संदीप माने आणि इश्ट्याक अहेमद उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

या मतदारसंघात साधारणत: 277900 मतदार आहेत. इथ मराठा, मुस्लीम आणि दलीत मतदार निर्णायक आहे. मात्र मराठा मतदार विभागल्या गेलेला आहे. या मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम हे दोघेच स्पर्धेत आहेत. तर भाजपा कडुन सुर्यकांता पाटील, माधवराव देवसरकर, पंडीतराव देशमूख यांनी उमेदवारीसाठी दावा केलाय. काँग्रेस कडुन माधवराव जवळगांवकर, गंगाधर चाभरेकर, बाबुराव पाथरडकर, अनील पाटील बाभळीकर यांच्यासह सुभाष वानखेडे ही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदार म्हणून नागेश पाटील यांची उमेदवारी कायम राहीली तर सेनेचे ईच्छूक बाबुराव कदम नाराज होतील आणि तस झाल तर नागेश पाटील अडचणीत येऊ शकतात. यावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यशस्वी तोडगा काढतील अशी शिवसैनीकांना आशा आहे. दुसरीकडे काँग्रेसची ऊमेदवारी गंगाधर चाभरेकर यांना मिळाल्यास माजी आमदार माधवराव पाटील काय भुमीका घेतात यावर चाभरेकर यांचे भवितव्य ठरणार आहे. हदगाव विधानसभेची निवडणूक प्रचंड अटीतटीची होईल यात काही शंका नाही.

हदगाव/ हिमायतनगरच्या समस्या

सध्या या मतदारसंघात रस्त्याची मोठी कामे सुरु आहेत, त्यातच वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाच कामही प्रगतीवर आहे. त्यामुळे इथले मतदार सरकारच्या कामगिरी वर थोडे बहुत खुष आहेत, रस्ते , रेल्वेच्या सोयीनंतर किमान हा मतदारसंघ विकासाच्या प्रवाहात येईल अशी इथल्या लोकांना आशा आहे. मात्र इथल्या शेतक-यांचे जिवनमान उंचावण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. यंदा अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हाथातुन गेल्या सारखी स्थिती आहे. पिकविमा, कर्जमाफीच्या कचाट्यात इथला शेतकरी अडकलेला आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघातून पैनगंगा, कयाधु अश्या दोन मोठ्या नद्या वाहतात. मात्र सिंचनासाठी इसापुरच्या धरणावरच शेतक-यांना अवंलबुन राहावे लागत. यंदा पावसा अभावी इसापुर धरण भरल नसल्यामुळे आगामी काळात शेतीला पाणी कस द्यायच हा मोठा प्रश्न शेतक-यासमोर आ वासुन उभा राहनार आहे. पर्यायी सिंचन व्यवस्था इथ उभारण्यात राज्यकर्त्याला यश आलेल नाही. उद्योग धंदे तर इथ नावालाही नाहीत. बेकारांची प्रचंड फौज आहे, स्थानीक पातळीवर रोजगार नसल्याने स्थलांतराशिवाय पर्याय नाही. वर्षानुवर्षे हीच मुद्दे निवडणुकीत येतात पण त्याकडे राज्यकर्त्ये गांभीर्याने पाहत नाहीत. उलट इथली विधानसभेची निवडणुक जातीपातीच्या वेगळ्याच मुद्द्यावर भरकटत जाते आणि संपतेही…आष्ठीकर आणि पवार जवळगावकर या दोन घराण्याने दीर्घकाळ या मतदारसंघाच प्रतीनीधीत्व केल. तुलनेने नागेश पाटील आष्ठीकर यांच्या काळात मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली अस मतदार सांगत असतात. त्यामुळे हदगाव हिमायतनगरचे मतदार यावेळेला आमदार म्हणून कुनाला निवडतात याकडे नांदेड जिल्ह्याच लक्ष आहे. प्रचंड चुरशीची अशी लढत इथ होत असते, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच नजर या मतदारसंघावर कायम असते. ————————————————————————————–

9} किनवट विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता ?

नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदीवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख आहे. या मतदारसंघात सातत्याने तीन वेळा निवडुन येण्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईक यांनी केलाय. या तीन्ही वेळेच्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांची माजी आमदार भिमराव केराम यांच्याशी जोरदार लढाई झाली. मात्र सातत्याने तिन्ही वेळा भिमराव केराम हे क्रमांक दोनचे मते घेत राहीली आणि प्रदीप नाईक निवडुन येत राहीले.

प्रदीप नाईक हे मितभाषी म्हणून परीचीत आहेत, दांडगा संपर्क आणि कायम भटकंती यामुळे त्यांच नाव मतदारसंघात लोकांना पाठ झालय. मात्र विकासाच्या नावावर प्रदीप नाईक फारसा प्रभाव दाखऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या बाबत नकारात्मक भावना निर्माण झालीय. त्यातच आता 2019 च चित्र पुर्णपणे वेगळ तयार झालय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच किनवट मतदारसंघातुन शिवसेनेला 44 हजार मतांचे मताधिक्य मिळालय. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने इथुन डॉ बी डी चह्वाण यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे स्थानीक शिवसैनीक नाराज झाले. मुळात या मतदारसंघात शिवसेनेच्या स्थापनेपासुन ज्योतीबा खराटे इथ कार्यरत आहेत.

शिवसेना वाढवत तिला जिवंत ठेवण्याच काम खराटेने केल. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी या मतदारसंघाकडे कायम दुर्लक्ष केल. त्यामुळे ज्योतीबा खराटे यांना उमेदवारी द्यावी अशी  सर्वांची भावना आहे. अस असल तरी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी करीश्मा करु शकते. गेल्या निवडणुकीच्या वेळी ऐन मतदानाच्या दिवसी धो धो पाऊस आल्याने भिमराव केराम काहीश्या मताने हारले होते. विशेष म्हणजे एकेकाळी भारीप बहुजन महासंघाच्या तिकिटावर याच मतदारसंघातुन भिमराव केराम हे आमदार बनले होते, त्यामुळे आता वंचित आघाडीची उमेदवारी कुणाला मिळते यावर सर्व गणीत अवलंबुन आहे.

या मतदारसंघात काँग्रेस वाढली नाही तर भाजपमध्ये नुसती गटबाजी आहे याचाच फायदा प्रदीप नाईक यांना तीन वेळा झाला. आता हिंगोलीचे खासदार बनलेले हेमंत पाटील यांनी इथ लक्ष घातलय, त्यामुळे इथ काय खेळी होते त्याकडे सर्वांच लक्ष आहे. विशेष म्हणजे आता याच किनवट मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाकडुन इथ इच्छुकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेस कडुन : राजेंद्र केशवे, किशन राठोड आणि माधवराव मरस्कोले इच्छुक आहेत. तर भाजप कडुन अशोक सुर्यवंशी, रमण जायभाये,सुमीत राठोड, संध्या राठोड, धरमसिंघ राथोड आनि यादव जाधव हे उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. तर शिवसेनेकडुन सचीन नाईक, ज्योतीबा खराटे रांगेत आहेत आणि वंचित आघाडीकडुन – हेमराज उईके, मोहन राठोड आणि किशन मिरासे उमेदवारी मागत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडुन विद्यमान आमदार प्रदीप नाईक हे एकमेव स्पर्धेत आहेत. माकपकडुन अर्जुन आडे हे ही इथ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरु शकतात.

     किनवटच्या समस्या : 

मराठवाड्यातील सर्वाधीक वनक्षेत्र असलेला हा एकमेव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील किनवट, माहुर या दोन्ही तालुक्यात प्रचंड अशी वनसंपदा होती. मात्र या वनसंपदेचे साध रक्षणही इथल्या राज्यकर्त्याला करता आल नाही. नैसर्गीक साधन संपदेवर अक्षरक्ष दरोडे पडत असतात त्यामुळे येत्या काही दिवसात हा मतदारसंघ भकास होईल अशी भिती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत असतात.

या दोन्ही तालुक्यात सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च झाले मात्र पाणी कुठ मुरल ते शेतक-यांना कळायला काही मार्ग नाही. स्वर्गीय उत्तमराव राठोड यांच्या काळानंतर या मतदारसंघात खरा विकास झालाच नाही. किनवट आणि माहुर तालुक्यातील अनेक प्रकल्प अपुर्ण आहेत. आरोग्य आणि शिक्षण या मुलभुत प्रश्नाकडे कायमच इथ दुर्लक्ष झालय. उच्च शिक्षण असो की दवाखाना या दोन्हीसाठी या मतदारसंघातील लोकांना यवतमाळ गाठाव लागत. जिल्हा मुख्यालय असलेले नांदेड दिडशे किलोमिटर दुर असल्यामुळे प्रशासनाची अनास्थाच या दोन्ही तालुक्याकडे होते.

आदिवासी बांधवासाठी येणा-या योजना प्रत्यक्षात राबवल्याच जात नाहीत, त्यामुळे आदीवासी यांचे जिवनमान उंचावण्यास काहीही मदत झालेली नाही. खुद्द आमदाराच्या गावात हगनदारी मुक्ती होऊ शकलेली नाही. मांडवी, इस्लापुर ला तालुक्याच्या दर्जा देऊन किनवटला जिल्हा करण्याची मागणी अनेक वर्षापासुन प्रंलबीत आहे. किनवट ते माहुर रेल्वे मार्गासाठी रेल्वेमंत्री असताना लालु यादव यांनी मान्यता दिली होती,  मात्र त्यासाठी काहीही हालचाली झालेल्या नाहीत. किनवटच्या शेजारीच पैनगंगा अभयारण्य आहे, मात्र इथ पर्यटकांच्या सोयीसोठी कुठल्याही सुवीधा नाहीत.

त्यामुळे पर्यटनाला वाव असुनही किनवट दुर्लक्षीत आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी मुळ पिठ असलेल माहुर याच मतदारसंघात आहे. तिर्थक्षेत्र माहुर मध्ये दरवर्षी लाखो भावीक हजेरी लावत असतात. मात्र इथ सरकारच्या वतीने भक्तांसाठी कुठल्याही सोयी सुवीधा नाहीत. उलट तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या माहुर नगरपंचायतीत अनेक घोटाळे झालेयत.

किनवट माहुरमध्ये उद्योगाची उभारणी करण गरजेचे आहे, या दोन्ही तालुक्यातील तरुण काम धंद्यासाठी तेलंगणात जात असतात. एकुणच विकासाच्या प्रवाहात अद्यापही हा मतदारसंघ आलेला नाही. या विधानसभा मतदारसंघात एकुण २ लाख ५६ हजार ५४४ मतदार आहेत. आदीवासी, बंजारा आणि अठरा पगड जातीच्या या मतदारसंघावर शेजारी असलेल्या वैदर्भीय प्रांताची छाप दिसत असते, त्यामुळे सध्या भाजप प्रेमात असलेल्या विदर्भाच हा मतदारसंघ अनुकरण करतो की काय याची लोकांना उत्सुकता आहे.

नांदेडमधील पक्षीय बलाबल

  • एकूण आमदार – 9
  • काँग्रेस – 3 ,
  • शिवसेना – 4 ,
  • राष्ट्रवादी – 1 ,
  • भाजप – 1
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.