Mahavikas Aghadi | भिन्न विचारसरणी, अडीच वर्षांचं सरकार! महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, कमाई काय गमाई काय?

अडीच वर्षांच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने ठाकरे घराण्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळालं. वाढत्या भाजपच्या ताकतीपुढे राष्ट्रावादीला उपमुख्यमंत्री पद अन् काँग्रेसलाही सत्तेत स्थान मिळालं.

Mahavikas Aghadi | भिन्न विचारसरणी, अडीच वर्षांचं सरकार! महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, कमाई काय गमाई काय?
मंजिरी धर्माधिकारी

|

Jun 30, 2022 | 2:44 PM

अडीच वर्षांचा काळ. तीन पक्षांचं सरकार. 28 नोव्हेंबर 2019 ला स्थापन झालेलं महाविकास आघाडी  (Mahavikas Aghadi) सरकार 29 जून 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोसळलं. शिवसेनेच्या 51 पैकी 39 आमदारांनी बंड पुकारलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या भिन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत बनवलेलं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार माघारी फिरलं.  हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत जवळफास 25 वर्ष शिवसेनेनं भाजपशी मैत्री केली. पण 2019 मध्ये भाजपशी सत्ता स्थापनेची बोलणी फिसकटली. शिवसेनेनं हिंदुत्वाची (Hindutwa) भूमिका मवाळ करत काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या सेक्युलर पक्षाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. अपेक्षेप्रमाणे भाजप विरोधी गटात बसला. तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकणार नाही, अशी भूमिका भाजपनं वारंवार लावून धरली. आघाडीत बिघाडी होण्याचे अनेक प्रसंग उद्भवले. पण तिघेही पक्ष जुळवून घेत होते. अखेर शिवसेनेतीलच आमदारांनी बंडाळी उफाळली. यापाठिशी भाजपचा हात आहे, हे उघड दिसत असलं तरीही शिवसेनेला घडणाऱ्या घटना थांबवता आल्या नाहीत. अखेर आमदारांनी पाठिंबा देण्यास नकार दिला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी अखेरपर्यंत साथ दिली, पण माझ्याच लोकांनी विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने ठाकरे घराण्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळालं. वाढत्या भाजपच्या ताकतीपुढेही राष्ट्रावादीला उपमुख्यमंत्री पद अन् काँग्रेसलाही सत्तेत स्थान मिळालं. या तिन्ही पक्षांनी अडीच वर्षांच्या काळात काय कमावलं आणि काय गमावलं, यावर एक प्रकाशझोत…

शिवसेनेनं काय गमावलं?

1989 पासून भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आले. अगदी 2019 च्या निवडणुकांपर्यंत दोन्ही पक्ष सोबत राहिले. मात्र सत्तेच्या लालसेपोटी याच वर्षी दोन्ही पक्ष दूर झाले. फडवणीसांचं पहाटेचं सरकार आणि उद्धव ठाकरेंनी केलेली महाविकास आघाडी, हे सत्ताकारणातूनच घडलेलं नाट्य. महाविकास आघाडी अडीच वर्ष चालली. यातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळालं. पण हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून त्यांना अंतर राखूनच रहावं लागलं. खुर्ची मिळण्यापूर्वी उद्धव ठाकरेंची प्रतिमा निष्कलंक होती. पण सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाचा विसर पडल्याचे आरोप सुरु झाले. यासाठी मागील अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरेंना आमचंच खरं हिंदुत्व आहे, असं स्पष्टीकरण देत बसावं लागलं. एवढंच नाही तर अयोध्येत जाऊनही हिंदुत्व सिद्ध करावं लागलं. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आदींच्या बंडावेळी ठाकरे सरकार तरलं. पण आता एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अवघी शिवसेना छिन्न-विछिन्न झाली आहे. एवढच काय तर शिवसेना या पक्षावरही दावा ठोकण्याच्या तयारीत शिंदेसेना आहे. उरल्या-सुरल्यातून म्हणजेच अगदी शून्यातून शिवसेना उभी करण्याचं आव्हान ठाकरे परिवारासमोर आहे.

काँग्रेसला काय मिळालं?

2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याइतपतही मतं नव्हती. ऐनवेळी काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सत्तेत तिसरे स्थान मिळाले. शिवसेनेसोबत सरकार चालवताना काँग्रेसलाही आपल्या विचारसरणीशी अनेकदा तडजोड करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे उपमुख्यमंत्री पदही नाही मिळालं आणि वजनदार खातीही नाही. देशात राजस्थान आणि छत्तीसगडमध्येच काँग्रेसची सत्ता टिकून आहे. तमिळनाडू आणि झारखंडमध्ये सत्तेत भागीदारी आहे. महाराष्ट्रातून दिवसेंदिवस क्षीण होत जाणाऱ्या काँग्रेसच्या हातून ही सत्ताही गेली. त्यामुळे 2024 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे.

राष्ट्रवादीचं भवितव्य काय?

विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही पवारांचा नंबर गेम फडणवीसांपुढे निष्प्रभ ठरला. त्यातच आज सत्तेतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही भाजपने दिलेला हा मोठा शह आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पण सत्तेच्या चाब्या पवारांकडे होत्या. उपमुख्यमंत्री पद, गृहखातंही राष्ट्रवादीकडे होते. उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार अॅक्टिव्ह झाले नाहीत तेव्हा शरद पवारच सक्रिय राहिले. त्यामुळेच त्यांच्यावर रिमोट कंट्रोलचे आरोप केले गेले. शिवसेनेच्या अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल परब हेही ईडीच्या जाळ्यात अडकलेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेससमोर भाजपचं मोठं आव्हान उभं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें