‘भाजप भौ-भौ करत राहतो’, पेडणेकरांचा टोला; ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो’, भातखळकरांचं प्रत्युत्तर

| Updated on: Jun 10, 2021 | 2:38 PM

पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही प्रत्युत्तर दिलंय. 'कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो', अशा शब्दात भातखळकर यांनी महापौरांवर पलटवार केलाय.

भाजप भौ-भौ करत राहतो, पेडणेकरांचा टोला; कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो, भातखळकरांचं प्रत्युत्तर
महापौर किशोरी पेडणेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : मालाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवरुन भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘भाजपला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत’ अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांवर खोचक टीका केलीय. पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही प्रत्युत्तर दिलंय. ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो’, अशा शब्दात भातखळकर यांनी महापौरांवर पलटवार केलाय. (Atul Bhatkhalkar’s reply to Mayor Kishori Pednekar’s criticism)

मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत महापौरांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप काय म्हणतंय ना ते भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असं ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम, असा चिमटा महापौरांनी काढला.

महापौरांच्या टीकेला भातखळकरांचं प्रत्युत्तर

महापौरांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. ‘मा. महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे’, असा पलटवार भातखळकर यांनी केलाय.

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन सदर दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जखमींवर सरकारी खर्चाने उपचार

मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते.

संबंधित बातम्या :

VIDEO: भाजपला भौ- भौ करत राहू दे, ते अगदी दूध के धुलेच आहेत; महापौर किशोरी पेडणेकरांचा टोला

Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले

Atul Bhatkhalkar’s reply to Mayor Kishori Pednekar’s criticism