माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 फेब्रुवारी) मतदान होत (Malegaon Sugar Factory Election) आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 फेब्रुवारी) मतदान होत (Malegaon Sugar Factory Election) आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर आणि विद्यमान सत्ताधारी गटाच्या सहकार बचाव पॅनेलमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या महिनाभरापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरु होता. यासाठी अजित पवार स्वत: रिंगणात उतरले होते. या कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी अजित पवार यांनी कार्यक्षेत्रात जाऊन जोरदार प्रचारबाजी केली. 2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा चंगच अजित पवारांनी बांधला आहे.  त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी अजित पवार समर्थकांचा निळकंठेश्वर पॅनल रिंगणात आहे. तर विद्यमान सत्ताधारी गटाकडून चंदरराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनल निवडणूक लढवत आहे. या दोन्ही पॅनलसह इतर 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. आज मतदान झाल्यानंतर उद्या (24 फेब्रुवारी) मतमोजणी होणार (Malegaon Sugar Factory Election) आहे.

माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता. त्यामुळे या निवडणुकीत विजय खेचून आणायचाचं असा चंग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बांधला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कारखाना परिसरात सभा घेत कारखान्याच्या भोंगळ कारभारावर घणाघाती टीका केली होती.

विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात कारखान्याच्या तांत्रिक बिघाडासह झालेल्या नुकसानीवर लक्ष्य करत सभासदांना सत्ता देण्याचं आवाहन केलं आहे. तर सत्ताधारी गटाकडून या हंगामात दिलेल्या जादा ऊसदरावर सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला.

अजित पवार यांनी या निवडणुकीत मागील बाबींची पुनरावृत्ती होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा कस लागला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्यात नेमकं कोण विजयी होणार याकडे सर्वांचचे लक्ष लागलं (Malegaon Sugar Factory Election) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI