अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील, हळदी कुंकवावरुन मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
Manoj Jarange Patil: आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांना संबोधित करताना बहिण मानलेल्या अमृता फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ते उपोषणासाठी मुंबईत येणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलत होते. आज त्यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांना संबोधित करताना बहिण मानलेल्या अमृता फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मुंबईत आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महिलांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ‘अमृता ताई, लता ताईंकडे जायचं शांततेत हळदी कुकुंसाठी. हिंदू असतील तर बाहेर येतील. हळदी-कुंकु सौभाग्याचं लेण आहे. सौभाग्याचं लेणं आहे म्हणून नवऱ्याला जाऊन सांगतील मराठ्यांना आरक्षण द्या.’
मनोज जरांगे पाटील यांनी काल दुपारी बैठकीची घोषणा केल्यानंतर रात्रीपासूनच शेकडो मराठा बांधव अंतरवलीत जमा झाले. आज पहाटेपासून तर अंतरवलीत प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आहे. वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव आल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून अंतरवलीत अन्नछत्र सुरू आहे. आजही या अन्नछत्रात मराठा बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मराठा समाजाला मुंबई आंदोलनाची हाक दिली. राज्यव्यापी बैठकीनंतर त्यांनी समाजाला मोठे आवाहन केले. त्यांनी मुंबईत जाण्याचा आणि मुक्कामाच्या ठिकाणाची माहिती दिली. त्याचवेळी मराठा आरक्षणावर मार्गदर्शन करताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळले.
मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.विक्रम साळी यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. वडीगोद्री चौकात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. सुरक्षा व्यवस्थेसह इतर बाबींचा पोलिसांनी सकाळीच आढावा घेतला.
