भाजपनंतर मनसेनेही विधानसभेचे रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात
राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चांमुळे मनसेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray Assembly Election : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु आहे. तर काही पक्षात इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोरदार कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हानिहाय विधानसभेचा आढावा घेणार आहे.
राज ठाकरेंकडे सादर केला जाणार अहवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात मनसेचे नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यांना निरीक्षक म्हणून नेमले आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांनी मनसे निरीक्षकांकडे प्रत्येक जिल्हानिहाय विधानसभेचा आढावा घेण्याची सूचना केली होती. याचा एक अहवालदेखील राज ठाकरेंनी मागितला होता. आज हा अहवाल राज ठाकरेंकडे सादर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुका लढवणार की नाही?
आज या निरीक्षक अहवालाबद्दलची माहिती राज ठाकरे घेणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे हे विधानसभा निवडणुका लढवणार की नाही, याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मनसेमध्ये अस्वस्थता
दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. पण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजपची भूमिका बदलली असा सूर मनसेकडून उमटत आहे. त्यातच देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण मोदींच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नसणं हे चर्चेचा विषय ठरलं. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चांमुळे मनसेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
