‘महाराष्ट्रातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच, कोंडी होणार पण कुणाची?’, अधिवेशनाआधी राऊतांचा निशाणा

सत्ता पक्षातील नेत्यांवर ईडी कारवाई करुन सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Sanjay Raut Saamana Editorial)

'महाराष्ट्रातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच, कोंडी होणार पण कुणाची?', अधिवेशनाआधी राऊतांचा निशाणा
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई : अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही. ‘महाराष्ट्रातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच तयार झाले आहेत. विरोधी पक्ष कोणत्या मुद्द्यांवर व गुद्द्यांवर सरकारची कोंडी करणार आहे? जरूर करा, पण त्याआधी तुमच्या पार्श्वभागाखाली कोणत्या मुद्द्यांना मोड फुटलेत तेही पाहा, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून (Sanjay Raut) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे. तसंच अधिवेशनात सरकारची कोंडी होणार नसून विरोधकांचीच कोंडी होणार असल्याचं त्यांनी अग्रलेखातून सूचित केलंय. (More than half of the problems in Maharashtra due to the central government Says Sanjay Raut Saamana Editorial)

विरोधक अधिवेशनात गोंधळाशिवाय दुसरं काही करतील अशी सुतराम शक्यता नाही!

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर गुद्दागुद्दी होणार? यावर गरमागरम चर्चा सुरू आहे. विधिमंडळात किंवा संसदेत अलीकडे मुद्दे कमी आणि गुद्देच जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी म्हणे जोरदार रणनीती ठरवली जाते. ही रणनीती म्हणजे काय, तर सरकारला बोलू द्यायचे नाही. सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडायचे. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत घुसून घोषणाबाजी करायची. हीच रणनीती यावेळीही ठरलेली दिसते. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात यापेक्षा वेगळे काही करील अशी सुतराम शक्यता दिसत नाही.

महाराष्ट्रातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच

सरकार पक्षावर आरोपांच्या फैरी झाडून नामोहरम करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्यच आहे, पण त्या आरोपांत थोडे तरी तथ्य असायला हवे. महाराष्ट्रापुढे जे प्रश्न आहेत त्यातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे तर पूर्णपणे केंद्र सरकारनेच हाताळायचे व निर्णय घ्यायचे विषय आहेत. या प्रश्नी राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालून काय साध्य होणार? मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्यात सरकारचे कायदेशीर प्रयत्न कमी पडल्याचा विरोधी पक्षाने सुरू केलेला बोभाटा एक बकवास आहे.

मग मोदींच्या दारात बसूनही आक्रोश करावा काय?

मराठा आरक्षणासंदर्भात 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबत केलेला कायदा रद्द केला. असा कायदा करण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगत आहे, पण आता त्याबाबत केंद्र सरकारने जी पुनर्विचार याचिका दाखल केली तीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मग केंद्र सरकारही मराठा समाजाला आरक्षण देण्यात कमी पडले म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दारात बसून आक्रोश करावा काय? हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने स्पष्ट करायलाच हवे.

राजकारण करु नका, मार्ग काढणं गरजेचं

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारची कोंडी करण्याची खुमखुमी विरोधी पक्षाला असेल तर मराठा समाजाचे गुन्हेगार म्हणून केंद्र सरकारलाही मोकळे सोडता येणार नाही. केंद्र सरकारची पुनर्विचार याचिकाच फेटाळण्यात आल्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. पण या सगळ्याचे राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढायचा आहे.

विरोधकांनी सरकारचं कौतुक करावं

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने जोरदार आघाडी घेतली आहे. लसीकरणाचा विक्रम घडवीत महाराष्ट्र पुढे जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे. इतर राज्यांत भडकलेल्या चिता आणि गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांचे भयंकर चित्र विरोधी पक्षाला अस्वस्थ करीत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत.

विरोधकांची अवस्था ‘बेघर आणि बेकार’

पण राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून महाराष्ट्रातील विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची अवस्था ‘बेघर आणि बेकार’ असल्यासारखी झाली आहे. समाजातील बेघर आणि बेकार ही नक्कीच एक गंभीर समस्या आहे, पण राज्यातील बेघर आणि बेकार विरोधी पक्षाचे काय, हा खरा प्रश्न आहे. ‘समाजातील बेघर व बेकारांची चिंता सगळयांनाच असते, पण बेघर व बेकारांनी देशासाठी काहीतरी कामही करायला हवे.

विरोधकांनीही राज्यासाठी काही काम करायला हवे

सत्तेचे छप्पर उडाल्याने बेघर आणि बेकार झालेल्या राज्याच्या विरोधकांनीही राज्यासाठी काही काम करायला हवे. मात्र तसे न करता काम करणाऱ्या सरकारपुढे अडचणी निर्माण करण्याचे उद्योग ते करीत आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर त्यांनी जरूर बोलावे. नुसते बोलू नये तर सरकारकडून कामे करून घेतली पाहिजेत.

(More than half of the problems in Maharashtra due to the central government Says Sanjay Raut Saamana Editorial)

हे ही वाचा :

विधानसभेत उद्यापासून खडाजंगी, पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यांवर गाजणार, प्रस्तावित विधेयकांची यादी जाहीर

“14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI