स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाची भीक नको, छत्रपती संभाजीराजेंचा विनोद तावडेंना घरचा आहेर

अनिश बेंद्रे

Updated on: Aug 19, 2019 | 3:47 PM

कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही, अशा शब्दात राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भाजप मंत्री विनोद तावडे यांना घरचा आहेर दिला आहे

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाची भीक नको, छत्रपती संभाजीराजेंचा विनोद तावडेंना घरचा आहेर

मुंबई : कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मुंबईत भीक मागून मदत गोळा केली होती. तावडेंच्या या कृत्याचा राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी निषेध केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्याही भीकेची गरज नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी विनोद तावडेंना घरचा आहेर दिला आहे.

‘स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही.’ अशा शब्दात संभाजी राजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. विनोद तावडे हातात डबा घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत मागत असतानाचा व्हिडीओ संभाजीराजेंनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.

छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्याशी ते संबंधित आहेत. छत्रपती संभाजीराजे हे चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. 11 जून 2016 रोजी राष्ट्रपतींनी राज्यसभेच्या खासदारपदी त्यांची नियुक्ती केली होती. संभाजी राजेंची नियुक्ती ही भाजपच्या कोट्यातून मानली जाते.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपच्या वतीने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघात 11 ऑगस्टला मदतफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री, तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या विनोद तावडे यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी मदत फेरीमध्ये सहभागी झाले होते.

बोरिवली विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी 110 डबे तयार करण्यात आले होते. प्रत्येक डब्यात जमा होणारा संकलित निधी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.

विनोद तावडे यांनी केलेल्या आवाहनानंतर विविध दुकानदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाले, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक, बेस्ट कर्मचाऱ्यांनीही आपली मदत तावडे यांच्याकडे जमा केली. मदतफेरीला नागरिकांनी पैशांसोबतच धान्य, बिस्किटं, पिण्याचं पाणी, विविध वस्तू, कपडे अशा स्वरुपात आपली मदत दिली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI