बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळाले.

बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. त्यानंतर महाराष्ट्रातही कन्नड लोक राहत असल्याचा इशारा देण्यात आला. आता स्वतः कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. युडीयुरप्पा यांनी महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याची भाषा केल्याने तणाव वाढला आहे. यावर महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते एन. डी. पाटील यांनी रुग्णालयात असतानाही येडीयुरप्पा यांना ठणकावलं आहे (N D Patil comment on Belgaum).

एन. डी. पाटील म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नसल्याचं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य दुर्दैवी आहे. खरं तर येडियुरप्पा त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसलेल्या विषयावर बोलत आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक वाढेल. येडियुरप्पा यातून आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत.”

“आमचे 70 हजार पानांचे पुरावे तयार, सर्वोच्च न्यायालय निवाडा करेल”

एन. डी. पाटील यांनी युडीयुरप्पांना हा विषय तुमचा नसून सर्वोच्च न्यायालय यावर निवाडा करेल असंही सुनावलं. तसेच आमचे 70 हजार पानांचे पुरावे तयार असल्याचंही ठणकावून सांगितलं. ते म्हणाले, “दोन्ही राज्यांच्या सीमावादाचा प्रश्न सोडवणं हे सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे. न्यायालयात हा निवाडा सुरू आहे. त्यासाठी आमचे 70 हजार पानांचे पुरावे तयार आहेत. ते पाहून सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय घेईन.”

Published On - 6:45 pm, Mon, 30 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI