मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे निश्चित, आता निर्णय स्वत: उद्धव ठाकरेंकडेच!

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं (Uddhav Thackeray for CM of Maharashtra), यावर एकमत झालं आहे.

मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे निश्चित, आता निर्णय स्वत: उद्धव ठाकरेंकडेच!

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं (Uddhav Thackeray for CM of Maharashtra), यावर एकमत झालं आहे. आता यावर अंतिम निर्णय स्वतः उद्धव ठाकरे हेच (Uddhav Thackeray for CM of Maharashtra) घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीबद्दल बोलताना ही माहिती दिली. तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांचं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमत असल्याचं सांगितलं.

शरद पवार म्हणाले, “आमची चर्चा पूर्ण झालेली नाही. मात्र, सरकारचं नेतृत्व कोणी करावं यावर आमचं सर्वांचं एकमत झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचं नेतृत्व करावं यावर आम्ही सर्वजण सहमत आहोत. सरकार कोणत्या किमान कार्यक्रमावर चालणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. ती चर्चा सुरु आहे. लिखित स्वरुपता हे सर्व समोर येईल. उद्या (23 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती आणि सत्तास्थापनेचं अंतिम सूत्र सांगितलं जाईल.”

उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षांच्या या संयुक्त बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माहिती देणे टाळले. ते म्हणाले, “मला तुम्हाला अर्धवट माहिती सांगायची नाही. जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते तुमच्यासमोर येऊ आणि तुम्हाला पूर्ण माहिती देऊ. तेव्हा एकही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही.”

यावेळी उद्धव ठाकरे यांनी किमान कार्यक्रमातील अनेक विषयांवर सहमती झाल्याचं सांगतानाच काही विषयांवर सहमती बाकी असल्याचंही नमूद केलं. तसेच उर्वरित विषयांवर देखील लवकरच निर्णय होईल, असं सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार याविषयी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थित ही बैठक झाली. यात मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री शिवसेनेचा होण्यावर एकमत झालं आहे. सोबतच किमान समान कार्यक्रमावर देखील चर्चा झाली. राज्यपालांकडेही जाणार असून या सरकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची राहील. भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वांची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याची होती. आता अंतिम माहिती उद्या (23 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI