शिवसेनेला दोन मंत्रिपदं, पण उद्या केवळ अनिल देसाईंचाच शपथविधी?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:24 PM, 29 May 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक आहेत.  मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता देशभरात आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या मोदींचा शपथविधी होत आहे. मात्र भाजपने मित्रपक्षांना मंत्रिपदं देताना हात आखडता घेतल्याचं दिसत आहे. कारण शिवसेनेने केंद्रात 5 मंत्रिपदं आणि लोकसभा उपाध्यक्षपद मागितलं असताना, उद्या शिवसेनेच्या केवळ एकाच मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

भाजपने 303 जागी विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. मित्रपक्षांनी मिळून 353 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेना आणि जेडीयूला दोन-दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्र्याचा समावेश असेल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 तर नितीश कुमार यांच्या जेडीयूने 16 जागांवर विजय मिळवला आहे.

शिवसेना आणि जेडीयूशिवाय मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या एका खासदाराला मंत्रिपद मिळू शकतं. अकालीचे दोनच खासदार निवडून आले आहेत. तर लोकस जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवानही पुन्हा मंत्री होतील. त्यांचे 6 खासदार निवडून आले आहेत.

शिवसेनेकडून अनेक नावे चर्चेत

राज्यात शिवसेनेकडून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, राज्यसभेचे खासदार अनिल देसाई आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेला जर तीन मंत्रीपदं मिळाली तर या तीन खासदारांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं. शपथविधीसाठी अवघे  काही तास उरले असल्याने कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या 

डॉ. प्रीतम मुंडेंसह महाराष्ट्रातील आठ ते नऊ खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता 

शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रीपदे, या तीन खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब?   

राज्यमंत्रिमंडळ विस्तार, जयदत्त क्षीरसागर, अनिल परब यांची नावं चर्चेत