Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | उद्धव ठाकरेंवर आगपाखड, डोळ्यांत अश्रूही तरळले
हनुमान जयंतीच्या निमित्तानं राणा दाम्पत्यानं सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं आणि त्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकप्रकारे नव्या लढाईचीच घोषणा केली. यापुढे ठाकरेंच्या सभेनंतर शुद्धीकरण करा, असं आवाहन राणांनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच जेलच्या आठवणीनं नवनीत राणांना अश्रूही अनावर झाले.

अमरावती : हनुमान जयंतीला अमरावतीतून खासदार नवनीत राणा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) चांगल्याच बरसल्या. राणा दाम्पत्यानं सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि चालीसा पठणानंतर, नवनीत राणांना जेलच्या आठवणीनं अश्रू अनावर झाले. गेल्या वर्षी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. मात्र तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात नवनीत राणा, रवी राणांना अटक झाली. त्वरित जामीन मिळू नये म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही नवनीत राणांनी केलाय. जेलच्या आठवणी आणि घटनाक्रम सांगितल्यानंतर नवनीत राणांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरेंकडे वळवला. ठाकरेंना अत्याचारी मुख्यमंत्री म्हणत, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची माती केल्याचा टीका राणांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या सध्या महाराष्ट्रात सभा सुरु झाल्यात. खेड, मालेगावनंतर महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्येही सभा झाली. पण आता ज्याही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा होणार तिथं शुद्धीकरण आणि हनुमान चालीसा पठण करा, असं आवाहन राणांनी कार्यकर्त्यांना केलंय.
राणा दाम्पत्याच्या निशाण्यावर कायमच उद्धव ठाकरे राहिलेत. पण जेलमध्ये टाकल्यापासून, राजकीय शत्रूत्व आणखीच वाढलंय. त्यामुळं सामूहिक हनूमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमातून नवनीत राणांनी टीकेची संधी सोडली नाही.
नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?
“माझ्यासारख्या महिला प्रतिनिधीला तुरुंगात पाणीसुद्धा दिलं नाही. मी शंभरवेळा आवाज दिले तेव्हा एकदा ऐकलं जायचं… मला आणखी एक महिना तुरुंगात ठेवण्याचा त्यांचा प्लॅन होता.. माझी लहान मुलंही विचारत होती, आई तुला जेलमध्ये का टाकलं?” असं नवनीत राणा यांनी सांगितलं. यावेळी नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अखेर स्टेजकडे पाठ करून त्यांनी डोळे पुसले. सभागृहात जय जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या… अन् पुढचं भाषण सुरु झालं.
मी लढण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. माझा विश्वास ते तोडू शकले नाहीत. खूप अत्याचार केले. प्रत्येक दिवशी मी 101 वेळा हनुमान चालिसा पठन केलं. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, ही प्रार्थना करत होते. तिथेच मी प्रण केला, बाहेर आल्यावर १११ फुटाची हनुमानाची मूर्ती उभी करेन. उद्धव ठाकरे, तुम्ही सोन्याचं ताट वापरत असाल तर गरीबांचा देवावरचा विश्वास जास्त आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पाठिशी देवाचा आशीर्वाद आहे, ते मी त्यांना करून दाखवलं, असं नवनीत राणा म्हणाल्या.
