पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, दिरंगाईचं कारणही नवाब मलिकांनी सांगितलं

| Updated on: Jan 04, 2020 | 10:31 AM

आम्ही नवीन विभाग तयार करण्याचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, दिरंगाईचं कारणही नवाब मलिकांनी सांगितलं
Follow us on

मुंबई : खातेवाटपाला होत असलेल्या दिरंगाईचं नेमकं कारण राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. नवीन खाती निर्माण करण्याचा विचार सुरु असल्यामुळे उशीर होत असल्याचा दावा मलिक यांनी केला. येत्या सोमवारपर्यंत मंत्रिपदं जाहीर केली जातील, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे शनिवार-रविवारचे दोन दिवस तरी खातेवाटपाचा मुहूर्त निघणार नसल्याचं (Nawab Malik on Portfolio Allocation) स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले, तरी खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे तीन पक्षात रस्सीखेच होत असल्याच्या चर्चा होत्या. मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप वेळेत झालं, मात्र खातेवाटपाचा घोळ कायम असल्यामुळे नेमकं कुठे पाणी मुरतंय, असा प्रश्न विचारला जात होता. आधी, काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याच्या चर्चा होत्या, नंतर खातेवाटपही लांबल्याचं बोललं जात आहे. मात्र नवाब मलिक यांनी नाराजी आणि तणातणीच्या चर्चा फेटाळल्या.

खातेवाटपाच्या दिरंगाईला दुसरं कोणतंही कारण नाही. आम्ही नवीन विभाग तयार करण्याचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ), मेट्रोशी संबंधित नवीन खाती निर्माण करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण विभागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सहकार खात्यावरही काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मात्र शिवसेनेचा कृषी खातं सोडण्यास नकार असल्यामुळे तणातणीची चिन्हं आहेत.

दुसरीकडे, बंदरे, खारभूमी, सांस्कृतिक खाती देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र कमी महत्त्वाची खाती घेण्यास काँग्रेसचा नकार आहे. त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचं म्हटलं जातं. आता खातेवाटपावर शरद पवार काय निर्णय घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं (Nawab Malik on Portfolio Allocation) आहे.

काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप

बाळासाहेब थोरात – महसूल, मदत आणि पुनर्वसन
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वडेट्टीवार – बंदरे, मत्स्य व्यवसाय, ओबीसी
के. सी. पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला आणि बाल कल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण
सुनील केदार – दुग्ध विकास आणि पशु संवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?

अनिल देशमुख- गृह
अजित पवार– अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील– जलसंपदा
दिलीप वळसे पाटील– कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड– गृहनिर्माण
नवाब मलिक– अल्पसंख्याक
हसन मुश्रीफ– सहकार
धनंजय मुंडे– सामाजिक न्याय

शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाची यादी

एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई– उद्योग आणि खनिकर्म
अनिल परब– सीएमओ
आदित्य ठाकरे– पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
उदय सामंत– परिवहन

Nawab Malik on Portfolio Allocation