चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी; हसन मुश्रीफांचा सणसणीत टोला

| Updated on: Nov 27, 2020 | 5:52 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीला त्यांनी ज्याप्रकारे तोंड दिले आहे, त्याला तोड नाही. | Hasan Mushrif

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी; हसन मुश्रीफांचा सणसणीत टोला
Follow us on

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, अशी खोचक टिप्पणी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली. (NCP leader Hasan Mushrif slams chandrakant Patil)

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नव्हे तर संघटना चालवण्यासाठी झाल्याची टिप्पणी केली होती. चंद्रकांतदादांच्या या टिप्पणीला हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीला त्यांनी ज्याप्रकारे तोंड दिले आहे, त्याला तोड नाही, असे कौतुक हसन मुश्रीफ यांनी केले.

तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे त्यांना सत्ता न मिळाल्यामुळे दु:खी आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपकडून केवळ राजकारण केले जाते. मात्र, भाजपच्या टीकेमुळेच आम्ही घट्ट एकत्र आलो. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

‘भाजपची सत्ता येऊ नये, असं नियतीलाच वाटत होतं’

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्याकडे बहुमत होते. मात्र, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द पूर्ण केला नाही. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका बदलली. भाजपची सत्ता येऊ नये, असं नियतीलाच वाटत होतं, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
याशिवाय, महाविकासआघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळातील नऊ महिने हे कोरोनाशी संघर्ष करण्यातच गेले. राज्य सरकारला महिन्याला 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागत आहे. ग्रामविकास विभागाने चांगले निर्णय घेतले, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

सरकार चालवण्यासाठी जो अनुभव लागतो तो उद्धव ठाकरे यांच्याकडे नसून अचानक आलेल्या जबाबदारीमुळे ते गोंधळून गेल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री सक्षम नसल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले असून मराठा समाजालाही त्याचा फटका बसल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

राज्यातील वीजबिलाचा प्रश्न असो की मराठा आरक्षणाचा, राज्य सरकारचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. कारण मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यकारभाराला कोणतीही दिशा दिली नाही. त्यांना प्रश्न समजवून घ्यावे, असे वाटत नाही, कारण त्यांचा जन्म पक्ष चालवण्यासाठी झाला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चिल्लर लोक, त्यांना उत्तर द्यावं इतकी त्यांची लायकी नाही, अनिल परबांची टीका

महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील; अशोक चव्हाण यांचा दावा

(NCP leader Hasan Mushrif slams chandrakant Patil)