रावणा, पंचाहत्तराव्या वर्षी धनुष्य उचलाल, तर बरगड्या तुटतील, संदीप क्षीरसागरांचा काकांवर निशाणा

वय 75 वर्ष झाले. या वयात काही उद्योग करु नका. अरे रावणा, पंचाहत्तरीत धनुष्य उचलाल तर बरगड्या तुटतील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका केली.

रावणा, पंचाहत्तराव्या वर्षी धनुष्य उचलाल, तर बरगड्या तुटतील, संदीप क्षीरसागरांचा काकांवर निशाणा

बीड : रावणा, पंचाहत्तराव्या वर्षी धनुष्य उचलाल, तर बरगड्या तुटतील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी काका आणि शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांच्यावर जहरी टीका केली. 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलंत, एवढे पैसे जर मतदारसंघात विकासाला लावले असते, तर ते जनतेच्या कामी आले असते, अशा शब्दात संदीप क्षीरसागर यांनी काकावर निशाणा साधला.

राजकारणात काका-पुतण्यातील वादाचा अंक अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. बीडसाठी तर तो नवीन नाहीच. त्यात आता जयदत्त क्षीरसागर यांची पुतण्याने अवहेलना केल्याचं समोर आलं आहे. ‘वय 75 वर्ष झाले. या वयात काही उद्योग करु नका. अरे रावणा, पंचाहत्तराव्या वयात धनुष्य उचलाल तर बरगड्या तुटतील’ असं संदीप क्षीरसागर म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत काहीच महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.

निवडणुका तोंडावर आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सामाजिक व्यासपीठावर काका जयदत्त क्षीरसागर राजकीय भाष्य करत आहेत, असा आरोप करताना, यापुढे असं कराल तर याद राखा कार्यकर्त्यांसह अण्णा तुमचेही कपडे पाडल्याशिवाय मी राहणार नाही, असा थेट इशारा पुतणे संदीप क्षीरसागर यांनी दिला.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये आली होती. जाहीर सभेत संदीप क्षीरसागर बोलत असताना व्यासपीठावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

‘अनेक शाळा-महाविद्यालयं त्यांचीच आहेत. दारु दुकान, रॉकेल लायसन्स यासह शहरातील सर्वच जमिनीही त्यांनी हडपली आहेत. एवढंच नाही तर राज्यात, देशात आणि परदेशातही जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर या दोघांच्या नावे संपत्ती आहे.’ असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.

माझ्या आरोपात जर काही तथ्य नसेल, तर एकाच व्यासपीठावर समोरासमोर बसू असं कडवं आव्हान संदीप क्षीरसागर यांनी दिलं. अनेकदा माझ्या काकांना तुम्ही निवडून दिलंत. मी तुमचं लेकरु आहे. एकदा मलाही संधी द्या अशी भावनिक साद संदीप क्षीरसागर यांनी बीडवासियांना घातली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *