काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज, सोडून जाऊ नका, जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना आवाहन

गेल्या 75 दिवसांपासून मी आणि माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ आहोत, तुम्ही काँग्रेसचं नेतृत्व करा, सोडून जाऊ नका, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राहुल गांधी यांना केलं आहे

काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज, सोडून जाऊ नका, जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना आवाहन

मुंबई : आता वेळ आहे, तुम्ही नेतृत्व करा, सोडून जाऊ नका, पक्षाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेण्याचे आर्जव केले आहे. फेसबुकच्या माध्यमातून आव्हाडांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली आहे.

‘तुमच्या राजीनाम्यामुळे, आणि त्यावर पुनर्विचार करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसवर ओढवलेलं संकट पाहून मला त्रास होत होता. सोनिया गांधी वयोमान आणि प्रकृतीच्या कुरबुरी असूनही काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणू शकतील, यात तीळमात्र शंका नाही. मात्र आपण एक संवेदनशील नेते आहात. सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला तुम्ही नेटाने तोंड देऊ शकता. हा क्रौर्य तसंच विकासाचा मुखवटा पांघरलेली प्रवृत्ती आणि लोकांची खरी काळजी यामधील लढा आहे. त्यामुळे तुम्हाला कठीण काळात नेतृत्वाची परीक्षा पास करावीच लागेल’ असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

गेल्या 75 दिवसांपासून मी आणि माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ आहोत, अशा भावनाही आव्हाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.

‘मी माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सुमारे 35 वर्षांपूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून केली आणि आज मी महाराष्ट्रातील विधानसभेचा सदस्य आहे. आधीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. या प्रवासात अनेक चढ-उतार येऊनही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवरील माझा विश्वास अढळ राहिला, ती कॉंग्रेसची सुवर्ण भेट मानतो’ असं आव्हाडांनी सुरुवातीला म्हटलं आहे.

‘कॉंग्रेस हा एक विचार असल्याचं मत तुम्ही वारंवार मांडता, या विचारधारेने आपल्या बहुसांस्कृतिक देशाला एक राष्ट्र म्हणून जोडले आहे. या विचारसरणीचा पाईक म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे, असं तुम्ही गृहित धरु शकता. मी तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता असलो तरी विचारसरणी समान आहे’ असंही आव्हाड म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षपदावर (Congress President) सर्वाधिक काळ राहिलेल्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी 2017 मध्ये राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपद सोपवण्यात आलं. मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी 3 जुलै 2019 रोजी राजीनामा दिला होता.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडेच राहावे, अशी मागणी झाली. राहुल गांधींनी मात्र गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष निवडण्यावर भर दिला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.

अखिल भारतीय काँग्रेसची सर्वसाधारण निवडणूक घेऊन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. सोनिया गांधींनी ही विनंती मान्य करत अंतरिम अध्यक्षपद स्वीकारलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *