एका महिलेच्या सुरक्षित मतदारसंघातून जिंकणं, यात काय पुरुषार्थ? जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

| Updated on: Feb 15, 2021 | 2:17 PM

एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघात जाऊन चंद्रकांत पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करत तो मतदारसंघ घेतला आणि निवडणूक लढवली. यात पुरुषार्थ आहे का? असा सवाल विचारत जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावलाय.

एका महिलेच्या सुरक्षित मतदारसंघातून जिंकणं, यात काय पुरुषार्थ? जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
Follow us on

सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघात जाऊन चंद्रकांत पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करत तो मतदारसंघ घेतला आणि निवडणूक लढवली. यात पुरुषार्थ आहे का? असा सवाल विचारत जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावलाय. चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.(NCP leader Jayant Patil criticizes BJP leader Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली. चंद्रकांतदादांनी स्वत:चं बघावं. शरद पवार यांची मापं काढू नयेत, असा सल्लाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. रविवारी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर खोचक टीका केली. त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली!

‘ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं, असंही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली. ‘माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये’, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला हाणला.

त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर शरसंधान साधलंय. एका महिला लोकप्रतिनिधीनं तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला आहे. चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय.

गोपीचंद पडळकरांवरही टीकास्त्र

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झाली आहे. ते किती अस्वस्थ झाले आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर यांची विधानं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, त्यांना किती फस्ट्रेशन आहे, हेच यातून स्पष्ट होत असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय. सत्ता मिळवण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचंच यातून दिसत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून

शरद पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाहीच; चंद्रकांत पाटलांची कबुली, म्हणाले….

NCP leader Jayant Patil criticizes BJP leader Chandrakant Patil