‘अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्याने संजय राऊत मुद्दाम आडवे’

| Updated on: Nov 12, 2019 | 11:38 AM

'अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्याने संजय राऊत मुद्दाम आडवे झाले आहेत' असा घणाघात निलेश राणेंनी ट्विटरवरुन केला आहे.

अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्याने संजय राऊत मुद्दाम आडवे
Follow us on

मुंबई : भाजपवासी झालेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. ‘अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्याने संजय राऊत मुद्दाम आडवे झाले आहेत’ असा घणाघात निलेश राणेंनी ट्विटरवरुन (Nilesh Rane Criticizes Sanjay Raut) केला आहे.

‘संजय राऊत यांना काही झालेलं नाही. शिवसैनिक फटकवतील आणि अति हुशारी दाखवून तोंडावर आपटले म्हणून ते मुद्दामून आडवे झाले आहेत. स्वतः चालत हॉस्पिटलमध्ये गेले आणि काही तासातच सगळी ऑपरेशन पण करुन झाली त्यांच्यावर. लोकं मूर्ख नाहीत संजय राऊत’ असं निलेश राणे म्हणाले. विशेष म्हणजे आजही त्यांनी राऊतांचा एकेरी उल्लेख केलेला आहे.

संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे काल दुपारी ते वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज असल्याचं अँजिओग्राफी रिपोर्टमध्ये समोर आलं होतं.

‘संजय राऊतांना काही दिवसांत शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील

‘मला तर वाटतंय येत्या काही दिवसांत संजय राऊत यांना शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’ असं ट्वीट निलेश राणे यांनी काल केलं होतं. त्यानंतर ‘आता नवीन नाटक… सगळी वाट लावून झाली आणि आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात दाखल. संजय राऊत अजून किती खालची पातळी गाठणार तुम्ही, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची वाट लावून आता दोन दिवस कोणालाच भेटणार नाही म्हणतात. शिवसैनिकांनो आताच तुम्हीच करा ह्यांचा बंदोबस्त.’ असं निलेश राणे काल म्हणाले होते.

‘संजय राऊत इतके गरीब आहेत, की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहू द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, अशी टीका निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.

राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील वाद जुना आहे. राज्यात सत्तास्थापनेवरुन संघर्ष सुरु असताना नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं होतं. परंतु निलेश राणे यांनी तिखट भाषेत समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांना टीव्ही, तर उद्धव ठाकरेंना कॅडबरी द्या : निलेश राणे

याआधीही, आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली होती. मात्र मीडियाने माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका निलेश राणे (Nilesh Rane Criticizes Sanjay Raut) यांनी घेतली होती.