‘रस्त्यावर रक्त सांडल्यास सरकार जबाबदार’, EVM वरुन विरोधक आक्रमक

'रस्त्यावर रक्त सांडल्यास सरकार जबाबदार', EVM वरुन विरोधक आक्रमक

नवी दिल्‍ली : लोकसभा निवडणूक मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. मात्र, त्याआधीच EVM, VVPAT विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आज 21 विरोधीपक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेत EVM आणि VVPAT बाबत आपले आक्षेप नोंदवले. काँग्रेस, सप, बसप, टीडीपी, टीएमसी, सीपीआय, जेडीएस, एनसीपीसह एकूण 21 पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीतील संविधान क्‍लब येथे बैठक घेतली.

विरोधी पक्षांनी आपल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदही घेतली. यावेळी राजदचे नेते रामचंद्र पूर्वे यांनी एक्झिट पोल खोटे असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “महाआघाडीचाच विजय होईल. निकालानंतर एनडीएमध्ये फूट पडले. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी हा EVM चा खेळ सुरु आहे.”

‘प्रथम बूथ लुटले जायचे, आता थेट निकालच लुटला जातो’

बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह म्हणाले, “एक्झिट पोल सरकारच्याच षडयंत्राचा भाग आहे. निकाल प्रभावित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आम्ही एक्झिट पोलचे निकाल सपशेल फेटाळतो. प्रथम बूथ लूटले जायचे, आता थेट निकालच लुटला जात आहे. मोदी असतील, तर निकालाची लुटही शक्य हे. बहुतेक जागांवर महाआघाडी जिंकत आहे.”

‘रस्त्यावर रक्त सांडेल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल’

उपेंद्र कुशवाह यांनी EVM वर बोलताना हिंसाचाराची शक्यता वर्तवली. रस्त्यावर रक्त सांडेल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही कुशवाह यांनी यावेळी दिला. दरम्यान उपेंद्र कुशवाह पत्रकार परिषदेत मध्येच सोडून गेल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेस नेते मदन मोहन झा यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. तसेच सरकारच्या मनात पाप असून 23 मे रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरतील, असेही ते म्हणाले.

‘हो, आम्ही घाबरलो आहोत’

बहुजन समाज पक्षाचे (बसप) सतीश मिश्रा म्हणाले, “आम्ही EVM शी संबंधित सर्व व्हिडीओ निवडणूक आयोगाला दाखवू आणि त्याबाबत त्यांच्याकडे उत्तर मागू. विरोधी पक्ष घाबरलेले आहेत या भाजपच्या आरोपावर समाजवादी पक्षाचे (सप) नेते रामगोपाल यादव यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले, “हो, आम्ही घाबरलो आहोत. 23 मे रोजी सायंकाळी सर्व समजेल.” तृणमूल काँग्रेसच्या अध्‍यक्ष ममता बनर्जींनी हे असे एक्झिट पोल हजारो EVM बदलण्यासाठी किंवा त्यात गडबड करण्यासाठी आणले जातात असा आरोप केला आहे.

‘माध्यमे आणि निवडणूक आयोग मिळून हे मतदान बदलत आहे’

दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही ट्विट करत आपले आक्षेप नोंदवले आहेत. सिसोदिया म्हणाले, “झासी, मेरठ, गाझिपूर, चंदोली, सारन या प्रत्येक ठिकाणी मतमोजणी केंद्रांवर EVM बदलली जात आहे. मात्र, निवडणूक आयोग आणि कथित माध्यमे मोदींसमोर नतमस्तक आणि डोळ्यांवर पट्टी बांधून गुडघ्यावर बसलेले आहेत. जनतेने मोदींविरोधात मते दिली आहेत. माध्यमे आणि निवडणूक आयोग मिळून हे मतदान बदलत आहे.”

आपल्या अन्य एका ट्विटमध्ये सिसोदिया म्हणाले, “देशभरात मतमोजणी केंद्रांजवळ ईव्हीएम खुल्या गाड्यांमध्ये पकडली जात आहेत. जनताच हे ईव्हीएम पकडत आहे. मात्र, स्वतःला पत्रकार समजणारे मोठमोठे लोक डोळे बंद करुन बसले आहेत. हा फेरफार करुन मोदी पुन्हा सत्तेत आले की हे लोक ईव्हीएमवर प्रश्न विचारणाऱ्यांवर तुटून पडतील.”

‘स्ट्राँग रूमबाहेर देखरेख करा’

राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांची ईव्हीएमबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी खोट्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नये. केवळ ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमबाहेर देखरेख करा. जेव्हा निकाल लागेल तेव्हा गोदीमीडिया आणि भाजपचा खरा चेहरा समोर येईल. ते तुम्हाला एक्झिट पोलच्या मानसशास्त्रात फसवत आतल्या आत मोठा खेळ खेळत आहेत.”

सोमवारी तेलुगू देसमचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनीही निवडणूक आयोगाला पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. तसेच 50 टक्के VVPAT मधील मतपत्रिकांची ईव्हीएमच्या मतांशी पडताळणी का केली जात नाही असाही प्रश्न विचारला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्‍वामी यांनी ‘एक्झिट पोल एका विशेष नेत्याच्या आणि पक्षाच्या बाजूने लाट असल्याचे खोटे वातावरण तयार करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे म्हटले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI