पक्षावर नाराज आहात का? आणखी एक दिवस थांबा, पंकजा मुंडेंचं उत्तर

| Updated on: Dec 11, 2019 | 12:51 PM

गोपीनाथगडावरील कार्यक्रम वेगळा आहे. त्याला कोणताही राजकीय रंग नाही' असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

पक्षावर नाराज आहात का? आणखी एक दिवस थांबा, पंकजा मुंडेंचं उत्तर
Follow us on

मुंबई : पक्षावर नाराज आहात का? असा प्रश्न भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विचारला असता, ‘इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा’ असं उत्तर पंकजा यांनी (Pankaja Munde on Rumors of leaving BJP) दिलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर पंकजांनी ‘स्वाभिमान दिवसा’चं आयोजन केलं आहे.

‘एकनाथ खडसे माझ्याकडे आले होते. जेवणाची वेळ होती. आम्ही एकत्र जेवण केलं. ही कौटुंबिक स्वरुपाची भेट होती. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला’ असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

‘जे मुंडे साहेबांच्या गडावर इतके दिवस येत होते, ते सर्व जण येणार आहेत. हा कार्यक्रम वेगळा आहे. त्याला कोणताही राजकीय रंग नाही’ असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. भाजपमधील वरिष्ठ नेते येणार का? असा प्रश्न विचारला असता ‘ज्यांनी जाहीर केलं आहे ते पक्षातील सर्व जण येतील’ असं उत्तर पंकजांनी दिलं.

आधी आजारपणामुळे भाजपच्या बैठकीला गैरहजर, नंतर रात्री 12 वाजता पंकजा मुंडेंचं ट्वीट

पक्षावरील नाराजीबाबत आपण उद्या बोलणार आहात का, असं विचारलं असता, ‘आपण इतके दिवस थांबला आहात, आणखी एक दिवस थांबा’ असं उत्तर पंकजा मुंडे यांनी हसत (Pankaja Munde on Rumors of leaving BJP)दिलं.

‘मुंडे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मी परळीला निघाले आहे. मुंडे साहेबांचे भक्त आणि त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते तिथे येणार आहेत. गोपीनाथगडावर तयारी सुरु असून मी एक दिवस आधी रवाना होत आहे. जे काय बोलायचं आहे ते उद्या बोलेन’ असं पंकजांनी स्पष्ट केलं.

बॅनरवर भाजपचा उल्लेख नाही

पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर अर्थात उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजप गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत (Pankaja Munde on Rumors of leaving BJP) आहे.

मी कोअर कमिटीत होतो, काढलं असेल तर माहिती नाही, बैठकांना निमंत्रण नाही : एकनाथ खडसे

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या विभागवार बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या होत्या. पंकजा यांची प्रकृती ठीक नसल्याचं कारण सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजांनी आपली परवानगी घेतल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी सोमवारी मध्यरात्री बारा वाजता ट्वीट करत समर्थकांना गोपीनाथगडावर येण्याचं पुन्हा आवाहन केलं. तर मंगळवारी मुंबईत त्या भाजपचे नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भेटल्या होत्या. भेटीनंतर खडसेंनीही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी निघाल्याचं सांगत कौटुंबिक भेट असल्याचं म्हटलं होतं.