परळी पंचायत समिती सभापतीची सोमवारी निवड, धनंजय मुंडे कुणाला संधी देणार?

सभापतीपद ओबीसी पुरुषाला सोडण्यात आले असले, तरी सभापती पदासाठी ओबीसी महिला देखील इच्छुक आहेत. मात्र, हे नेतृत्व ओबीसी मुस्लिम समाजाकडे द्या अशीही मागणी होत असल्याने धनंजय मुंडेंसमोर एक कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

परळी पंचायत समिती सभापतीची सोमवारी निवड, धनंजय मुंडे कुणाला संधी देणार?

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात परळीचं मोठं स्थान आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघातील आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. अशात उद्या म्हणजेच सोमवारी (30 डिसेंबर) परळी पंचायत समिती सभापती पदासाठीची निवडणूक होणार आहे (Parli Panchayat Samiti Sabhapati Election). यंदाचं सभापतीपद ओबीसी पुरुषाला सोडण्यात आले असले, तरी सभापती पदासाठी ओबीसी महिला देखील इच्छुक आहेत. मात्र, हे नेतृत्व यावेळी ओबीसी मुस्लिम समाजाकडे द्या अशीही मागणी होत आहे, त्यामुळे आमदार धनंजय मुंडेंसमोर ( Dhananjay Munde) एक कडवे आव्हान उभे ठाकले आहे (Parli Panchayat Samiti Sabhapati Election).

परळी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना बळ देत परळी मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मतं दिली. त्यामुळेच विद्यमान आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांना दारुण पराभव सहन करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातला पहिला पॅटर्न शीरसाळा ग्रामपंचायतीमधून समोर आला. महाविकास आघाडीकडून पहिली निवडणूक लढवत ग्रामपंचायत ताब्यात घेऊन राज्यासमोर एक नवीन पॅटर्न ठेवला. उद्या परळी पंचायत समिती सभापतीच्या निवडणुका आहेत. परळीची निवडणूक धनंजय मुंडेसाठी प्रतिष्ठेची असते.

यंदाचं सभापतीपद ओबीसी पुरुषाला सुटले आहे. सभापती पदासाठी ओबीसी महिला देखील इच्छुक आहे. सध्या दोन पुरुष सदस्य तर एक महिला सदस्य ओबीसी आहेत. पंचायत समिती स्थापन झाल्यापासून अद्याप मुस्लीम समाजाकडे नेतृत्व आले नाही. त्यामुळे यंदा सभापतीपद मुस्लीम समाजाकडे द्यावे अशीही मागणी होत आहे. तर दुसरीकडे, एक पुरुष आणि महिला सदस्य या निवडणूक रिंगणात असल्यामुळे धनंजय मुंडेंसमोर एक कडवे आव्हान आहे.

शीरसाळा सर्कलमधून जानी मिया कुरेशी तर नाथ्रा गणातून पिंटू मुंडे आणि उर्मिला गीते यांचा समावेश आहे. सध्या सभापतीपदासाठी उर्मिला गीते यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, 55 वर्षात मुस्लीम समाजाला एकदाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने धनंजय मुंडे यांना मोलाची मदत केली आहे. धनंजय मुंडे यांनी समधर्म समभाव म्हणून मुस्लीम समाजाकडे पंचायत समितीच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, अशी मागणी मतदारसंघातून होत आहे. धनंजय मुंडेंनी मुस्लीम समाजाला नेतृत्व दिलं, तर नक्कीच भविष्यात धनंजय मुंडेंसाठी हे फायदेशीर ठरणार आहे, असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. मतदारसंघातील कोणत्याही जातीचा गट नाराज होऊ नये, याची धनंजय मुंडेंनी कटाक्षाने काळजी घेतली. आता धनंजय मुंडे पंचायत समितीवर कुठल्या समाजाचे नेतृत्व देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI