उत्तर प्रदेशातील मतांसाठी मोदींची पाच वर्षांनी ‘अयोध्यावारी’

उत्तर प्रदेशातील मतांसाठी मोदींची पाच वर्षांनी 'अयोध्यावारी'


अयोध्या (उत्तर प्रदेश) : पाच वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय पुन्हा अयोध्येला लागत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर, मोदी यंदा पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अयोध्येत दाखल होत आहेत. मोदींच्या अयोध्यावारीमुळे राम मंदिर निर्माणाबाबत त्यांनी दिलेल्या वचनांच्या आठवणी ताज्या झाल्यात. अगदी पक्षाच्या स्थापनेपासून राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याशिवाय भाजपचा जाहीरनामा पूर्णच होऊ शकलेला नाही. यंदाही हा मुद्दा भाजपच्या जाहीरनाम्यात आहेच. पण मोदी प्रचारात राम मंदिर निर्माणावर काय ठोस भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

राम मंदिर निर्माणाबाबत गेल्या पाच वर्षात झालेल्या कार्यवाहीबाबत भाजपचा प्रेरणास्रोत मानला जाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींबाबत समाधानी नाही. एनडीएतील घटकपक्षांपैकी शिवसेनेनं तर थेट अयोध्येत येऊन शक्तिप्रदर्शन केलं होतं. एनडीएत धर्मनिरपेक्षवादी मानले जाणाऱ्या नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत मोदींना करावी लागते आहे. बहुमतातले सरकार असतानाही मोदींनी राम मंदिर निर्माणाचा अध्यादेश काढला नाही, याबद्दल हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्यांमध्ये सल आहे. NDA चे व्यापक हित लक्षात घेत हिंदुत्ववाद्यांनी सध्या संयमी भूमिका घेतली असली तरी निवडणुकीच्या निकालानंतर ते राम मंदिर निर्माणावर अधिक आग्रही आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.

राजकीय विश्लेषकांना मात्र मोदींची अयोध्यावरी ही धूर्त खेळी वाटते आहे. सपा-बसपाने निवडणुकीत जाती-पातीच्या नावाने मतांची व्यूहरचना आखली असल्याने, त्याला छेद देण्यासाठी धर्माच्या माध्यमातून भावनिक साद घातली जाऊ शकते, राजकीय विश्लेषकांना ‘पोलरायझेशन ऑफ व्होट्स’ हा मोदींच्या अयोध्यावारीचा केंद्रबिंदू वाटतो.

गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी नवे मित्र जोडण्यासाठी जगभर फिरले. पण निवडणुकीत मतांसाठी त्यांना बॅक टू बेसिकलाच यावं लागलंय. वाराणसीत रोड शो, गंगा पूजन आणि उमेदवारी अर्ज भरताना एनडीएतील मित्रपक्षांसोबत शक्तीप्रदर्शन करीत उत्तर प्रदेशमध्ये वातावरण निर्मिती करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. अयोध्येतील प्रचारातून उत्तर प्रदेशातील आणि पर्यायाने केंद्रीय राजकारणावर पकड आणखी घट्ट करण्याचा मोदींचा इरादा मानला जातो आहे.

‘सुबह का भूला शाम को घर वापस आये तो ऊसे भूला नहीं कहते’… मोठ्या कालावधीनंतर अयोध्येत प्रचारासाठी येणाऱ्या नरेंद्र मोदींच्याबाबतीत तेच घडताना दिसते आहे. प्रचारात मोदी नाराजांच्या शंका-गैरसमज दूर करतील का? हा मुद्दा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI