योग शिबीर फक्त निमित्त, मुख्यमंत्र्यांचं टार्गेट काँग्रेसचा गड

योग शिबिर नांदेडमध्ये योगायोगाने आयोजित करण्यात आलेलं नाही, तर त्याला राजकीय किनार असल्याचे मानले जात आहे. नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो.

योग शिबीर फक्त निमित्त, मुख्यमंत्र्यांचं टार्गेट काँग्रेसचा गड

नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेडची जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोठी मेहनत घेतली होती. भाजपच्या उमेदवारांनीही प्रचंड मेहनत घेतल्याने प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण आपल्याच मतदारसंघात अडकून पडले. त्यानंतर काँग्रेसचा गड अशी ओळख असलेली नांदेडची जागा जिंकल्यानंतर मुख्यमंत्री आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे दिसते आहे. त्यामुळेच येत्या 21 जून रोजी अर्थात योगदिनी नांदेडमध्ये राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन स्वामी रामदेव बाबा करणार आहेत. राज्यातील अन्य महत्वाच्या शहरांना डावलून नांदेडमध्ये हे शिबीर घेतलं जात असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘स्वस्थ महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे. शहरातील कौठा भागात चाळीस एकर जागेवर हे शिबीर घेण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रधानमंत्री मोदी यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणीच हे योग शिबीर होणार आहे. नव्याने निवडून आलेले खासदार प्रताप पाटील आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने या योग शिबिराची तयारी करण्यात येत आहे. योग दिनाला आयोजित या पूर्वीच्या गर्दीचे विक्रम मोडण्याचा या निम्मीताने प्रयत्न करण्यात येतोय. त्याची जय्यत तयारी नांदेडमध्ये केली जात आहे.

योग शिबिर नांदेडमध्ये योगायोगाने आयोजित करण्यात आलेलं नाही, तर त्याला राजकीय किनार असल्याचे मानले जात आहे. नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो. इथल्या साऱ्या स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभेवर प्रामुख्याने काँग्रेसचं वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीच्या निम्मीताने भाजपचा आता नांदेड प्रवेश झाला आहे. त्यातच आता आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नांदेडमध्ये हे योग शिबीर घेतल्या जात असल्याचे राजकीय जाणकारांना वाटत आहे. मात्र या शिबिराच्या निमित्ताने नांदेड भाजपयुक्त बनेल, अशी आशा बाळगणे अवघड आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अशोक चव्हाण आता प्रचंड सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपचा हा डाव कितपत यशस्वी होतो, हे येणारा काळच ठरवेल.

Published On - 8:26 pm, Sat, 15 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI