केंद्राने मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट आणि निधी गेला कुठे?; प्रसाद लाड यांचा सरकारला सवाल

| Updated on: Apr 25, 2021 | 5:34 PM

केंद्र सरकारने पाच महिन्यांपूर्वीच राज्यासाठी 10 ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. (prasad lad allegation on maha vikas aghadi over oxygen plant in maharashtra)

केंद्राने मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट आणि निधी गेला कुठे?; प्रसाद लाड यांचा सरकारला सवाल
प्रसाद लाड
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने पाच महिन्यांपूर्वीच राज्यासाठी 10 ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. पाच महिने झाले तरी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला नाही. या प्लांटचं काय झालं? हा निधी गेला कुठे? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला केला आहे. (prasad lad allegation on maha vikas aghadi over oxygen plant in maharashtra)

प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. कोरोना महामारीच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये, प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2021मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठविली होती. त्यानुसार ‘पीएम केअर’ निधीतून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या 4-5 महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरु केला नाही. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केंद्राने दिलेले अर्थसहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले असते. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली.

सरकारने निधी खाऊन टाकला

एका पोलीस अधिकाऱ्याकडून वसुली करणाऱ्या या सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी ‘खाऊन’ टाकला अशी घणाघाती टीका करत लाड म्हणाले की, ‘घरात बसलेल्या’ सरकारने कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठींही काहीही केले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य जनतेचा बळी जात आहे.

रेमडेसिवीरची औषधे कुठे गायब झाली?

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार 10 दिवसात 4 लाख 35 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला 1 लाख 65 हजार औषधे मिळाली आहेत. तसेच राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून 5 लाख औषधांची खरेदी केलेली आहे. तरीही सध्या राज्यात औषधांचा तुटवडा आहे. ही औषधं कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का? राज्य सरकारने या सर्व औषधांचा हिशोब द्यावा व जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी तयांनी केली.

ती टोपेंची इच्छा होती का?

वसई-विरार मध्ये रूग्णालयाला आग लागल्याने 13 रूग्णांचा मृत्यू झाला ही अतिशय क्लेशदायक बातमी आहे. मात्र, अशा घटना घडल्यावर मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देऊन राज्य सरकारची जबाबदारी संपत नाही. एखादी बातमी ही महत्वपूर्ण व राष्ट्रीय बातमी होण्यासाठी अधिक रgग्णांचे मृत्यू व्हावेत अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इच्छा होती का?, असा सवालही त्यांनी केला.

पत्रकारांचे लसीकरण करा, पास द्या

पालघरच्या तलासरी सारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट आहे. आरोग्य सुविधांचा तुटवडा आहेत पण सरकारच्या निर्बंधामुळे रूग्णांना जवळ असलेल्या गुजरातमधील रुग्णालयांमध्ये जाता येत नाही. तसेच तेथील डॉक्टरांना तलासरी येथे रूग्णांना उपचार देण्यासाठी येण्याची परवानगी मिळत नाही. राज्य सरकारने आदिवासी बांधवांना उपचार घेण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात तसेच कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या पत्रकार बांधवाचे तातडीने लसीकरण करावे व रेल्वे प्रवासासाठी त्यांना पास द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. (prasad lad allegation on maha vikas aghadi over oxygen plant in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो; चंद्रकांतदादांनी बोलून दाखवली सल

माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, पाणी घेतल्याचं सिद्ध झाल्यास राजकीय सन्यास घेईन : दत्तात्रय भरणे

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?; निलेश राणे यांची घणाघाती टीका

(prasad lad allegation on maha vikas aghadi over oxygen plant in maharashtra)