Prashant Kishor : ‘इज्जत विकून सत्ता मागितली’, प्रशांत किशोर कुठल्या नेत्यावर इतके भडकले?
Prashant Kishor : प्रशांत किशोर हे राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. राजकीय रणनितीकार म्हणून त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाबाबत त्यांनी एक भविष्यवाणी केलेली. ती चुकीची ठरली. भाजपाने तिसऱ्यांदा सरकार बनवलं, पण त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करता आलं नाही.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मागच्या आठवड्यात NDA नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. या बैठकीत एनडीएमधील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी प्रशांत किशोर चर्चेत होते. भाजपाला 2019 इतक्याच म्हणजे 303 च्या आसपास जागा मिळतील. भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात भाजपाला 240 जागांवर समाधान मानाव लागलं. पूर्ण बहुमतापासून ते 32 जागा दूर राहिले. एनडीएच्या साथीने त्यांनी सरकार बनवलं. मागच्या आठवड्यात एनडीएच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडताना दिसले. हे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये प्रशांत किशोर सुद्धा एक आहेत.
सत्तेत कायम राहण्यासाठी नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पाया पडले असा आरोप प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर केला. प्रशांत किशोर राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जातात. जन सुराज अभियानाच्या एका सभेमध्ये बोलताना प्रशांत किशोर यांनी हा आरोप केला. शुक्रवारी 14 जून रोजी प्रशांत किशोर यांनी एकासभेला संबोधित केलं.
त्या बदल्यात काय मागितलं?
त्यावेळी ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी मीडियाचे लोक म्हणत होते की, नितीश कुमार यांच्या हातात भारत सरकारची कमान आहे. नितीश कुमार यांची इच्छा नसेल तर देशात सरकार बनणार नाही. इतकी ताकद नितीश कुमार यांच्या हातात आहे” “पण त्या बदल्यात नितीश कुमार यांनी काय मागितलं?. बिहारच्या मुलांसाठी रोजगार, बिहारमध्ये साखर कारखाने, बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा यापैकी काही मागितल नाही” अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.
‘इज्जत विकून सत्ता मागितली’
बिहारचे लोक विचार करत असतील, मग त्यांनी मागितलं काय? यावर प्रशांत किशोर म्हणाले की, “नितीश कुमार यांनी बिहारच्या सर्व लोकांची इज्जत विकून सत्ता मागितली. त्यांना 2025 नंतर मुख्यमंत्री पदावर रहायचय. त्यासाठी भाजपाकडे समर्थन मागितलय” “नितीश कुमार 13 कोटी लोकांचे नेते आहेत. आमचा अभिमान, सन्मान आहे. ते सगळ्या देशासमोर झुकून मुख्यमंत्री बनण्यासाठी पाया पडत होते” असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. जन सुराज अभियान सुरु करण्याआधी प्रशांत किशोर जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.