Pratibha Dhanorkar: चापट मारली की मस्करी केली? बसमध्ये नेमकं काय घडलं खासदार प्रतिभा धानोरकरांनीच सांगितलं
Pratibha Dhanorkar: दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबर रोजी रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार गेले होते. दरम्यान, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सध्या सोशल मीडियावर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा दिल्ली येथील आंदोलनादरम्यानचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये प्रतिभा या बसमध्ये बसलेल्या असताना तेथे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे बोलत असताना अचानक गालात चापट मारताना दिसत आहेत. त्यांनी मिश्कीलपणे ही चापट मारली की खरोखर मारली याचे अनेक अनुमान लावले जात आहेत. आता या सगळ्यावर स्वत: प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांने स्पष्ट शब्दात बर्वेंनी चापट मारली नाही, बदनामी करू नका असे म्हटले आहे.
दिल्ली आंदोलनादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होताच खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “आम्ही सगळे खासदार हे भावा आणि बहिणीसारखे राहतो. मूळात बातमी करण्यासारखा हा विषयच नव्हता. श्यामकुमार बर्वे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. अशा पद्धतीने एखाद्या महिला खासदाराची बदनामी करणे अजिबात योग्य नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांकडे याबाबतची तक्रार करणारे आमचे हितचिंतक किंवा राजकीय विरोधक असू शकतात.”
मला चापट मारली असती तर…
प्रतिभा धानोरकर आणि श्यामकुमार बर्वे यांचा व्हिडीओ समोर येताच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याचे देखील म्हटले जात आहे. याबाबत बोलताना प्रतिभा म्हणाल्या की, श्यामकुमार बर्वे यानी खरंच जर मला चापट मारली असती तर मी स्वत: काँग्रेस नेतृत्वाकडे याबाबतची तक्रार केली असती.
नेमकं प्रकरण काय?
1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार गेले होते. या रॅलीत जाण्यासाठी एका बसमधून सर्व खासदारांना नेण्यात आले. बस प्रवासादरम्यान, खासदार श्यामकुमार बर्वे हे प्रतिभा यांच्याशी बोलत असतात. प्रतिभा यांच्या शेजारी मुंबई काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड देखील बसलेल्या दिसत आहेत. तिघांमध्ये काही तरी संभाषण सुरु होते. संभाषणादरम्यान, श्यामकुमार बर्वे हे प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हाताने हलकी चापट मारतात. हा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचे दिसले.
