चंद्रकांत पाटलांकडून 3 मतदारसंघाची चाचपणी, निवडणूक मैदानात उतरण्याची चिन्ह

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) यावेळी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) मैदानात ताकदीने उतरताना दिसत आहेत.

चंद्रकांत पाटलांकडून 3 मतदारसंघाची चाचपणी, निवडणूक मैदानात उतरण्याची चिन्ह


कोल्हापूर: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) यावेळी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) मैदानात ताकदीने उतरताना दिसत आहेत. असं असलं तरी ते निवडणुकीच्या रिंगणात असणार की नाही याबाबत केवळ तर्कवितर्क लढवले जात आहेत. निवडणूक लढवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला तरी पाटील यांनी निवडणुकीसाठीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरु केली आहे.

चंद्रकांत पाटील कोठून निवडणूक लढणार याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी विधासभा निवडणुकीत ते कोणत्या मतदारसंघातून शड्डू ठोकतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. त्यांच्यासाठी 3 मतदारसंघांची चाचपणी सुरू असल्याचीही चर्चा आहे. यात कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि चंदगडची चर्चा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील अन्य इच्छुकांची मात्र घालमेल वाढली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मागील 5 वर्षात भाजपनं चांगलीच मुसंडी मारली आहे. जिल्हापरिषद महानगरपालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं आपला झेंडा फडकवला आहे. भाजपच्या या यशात चंद्रकांत पाटलांची महत्वाची भूमिका राहिली आहे. 2014 मध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातही वर्चस्व निर्माण करणं भाजपसाठी गरजेचं होतं. त्यासाठी स्थानिक गटांची मदत घेण्याची रणनीती चंद्रकांत पाटलांनी आखली. यात ते यशस्वी देखील झाले.

कोल्हापूरमध्ये एका बाजूला भाजपची ताकद वाढत असली, तरी चंद्रकांत पाटील लोकामंधून निवडणूक न आल्यानं त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकाही केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याच विषयावरून चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली होती. तसेच त्यांना निवडणुकीला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं होतं. आता निवडणुकाजवळ आल्या असून चंद्रकांत पाटील हे आव्हान पेलणार का हे पाहावे लागेल. त्यातच भाजपमध्ये झालेले इंनकमिंग आणि त्यामुळे वाढलेली इच्छुकांची संख्या यावर इलाज म्हणून चंद्रकांत पाटलांनी स्वतः उमेदवारी घ्यावी, असाही आग्रह कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे.

स्वतः चंद्रकांत पाटील मात्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनीच निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यानं ते निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची जमावजमाव करत असल्याचंही बोललं जात आहे. ते राधानगरी, चंदगड किंवा कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील ज्या संभाव्य जागेवरून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्या जागा शिवसेनेकडे आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीने शिवसेनेसह भाजप आणि विरोधी पक्षातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची चांगलीच घालमेल वाढली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI