महाराष्ट्र काँग्रेसवरील नाराजीतून राहुल गांधींनी प्रचारातून माघार घेतल्याची चर्चा, बँकॉकला रवाना

| Updated on: Oct 06, 2019 | 11:37 AM

राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसच्या कारभारावर काहीसे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. नेत्यांमध्ये दुफळी माजल्यामुळे राहुल गांधी यांनी प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसवरील नाराजीतून राहुल गांधींनी प्रचारातून माघार घेतल्याची चर्चा, बँकॉकला रवाना
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. दोन राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी बँकॉकला (Rahul Gandhi leaves for Bangkok) निघून गेले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसवरील नाराजीतून राहुल गांधींनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून झालेला पराभव जिव्हारी लागलेले राहुल गांधी या निवडणुकीपासून विजनवासात गेले होते. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस आपली हुकूमाची पानं बाहेर काढण्याची शक्यता होती, मात्र राहुल गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्र राज्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असल्यामुळे दिल्लीतील दिग्गज नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणं साहजिक मानलं जात होतं. एकीकडे शिवसेनेचे ‘युवराज’ आदित्य ठाकरे मैदानात उतरलेले असताना काँग्रेस ‘युवराज’ मात्र माघारी (Rahul Gandhi leaves for Bangkok) परतले आहेत.

विधानसभेसाठी महाराष्ट्रात शरद पवार-प्रियांका गांधींच्या एकत्र प्रचारसभा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या 20 रॅली महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या होत्या. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव अशा वेगवेगळ्या पाच भागांमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचं वृत्त होतं. मात्र अचानक राहुल गांधींनी प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसच्या कारभारावर काहीसे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. नेत्यांमध्ये दुफळी माजल्यामुळे राहुल गांधी यांनी प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह, कालिदास कोळंबकर यासारख्या नेत्यांनी नजीकच्या काळात पक्षाची साथ सोडली. एकीकडे काँग्रेसला लागलेली गळती आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षांतील मेगाभरतीमुळे विधानसभेला राहुल गांधींच्या रुपाने ‘ट्रम्प कार्ड’ पडणं अपेक्षित होतं.

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा आघाडीचं जागावाटप ठरलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रियांका गांधी अशा दोन पक्षांच्या दोन दिग्गज नेत्यांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रियांका गांधी आणि शरद पवार पहिल्यांदाच एका रॅलीमध्ये एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. परंतु राहुल गांधी यांचं महाराष्ट्राला दर्शन घडण्याची शक्यता धूसर दिसते.