बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर
शिवचरित्र अनेकांनी लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं... बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
पुणे : “अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं… बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाचा सन्मान केला. तसंच त्यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्या टीकाकारांना अप्रत्यक्षपणे राज यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला चिरतरुण आवाजाच्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), महापौर मुरलीधर मोहोळ यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
बाबासाहेबांच्या लिखाणात दंतकथांना वाव नाही, राज ठाकरेंची बाबासाहेबांवर स्तुतीसुमने
“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो… आता मला त्यांच्या सहवास लाभला… बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात… इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करु नये हे सांगतात…”
“इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात… बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे… ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने बाबासाहेब इतिहास सांगतात… दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही… शिवचरित्र अनेकांनी लिहिली… पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवलं… बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा… आमची नातवंड, पतवंडं तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील”, अशी इच्छा व्यक्त करुन राज ठाकरे यांनी बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरेंच्या भाषणाची नवी सुरुवात
जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी राज ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता लोकांच्या अंगवळणी पडलीय. मात्र आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची नवी सुरुवात केली. अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, असं म्हणत राज ठाकरे यांनी आजच्या कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं.
या वयातही आशाताई काय दिसतात ना…!
“मंचावर उपस्थित आशा भोसले यांच्या सौंदर्याचं वर्णन करताना राज ठाकरे यांनी केलं. यावेळी त्यांनी आशाताईंची प्रेमळ फ्लर्टिंग केली. कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत…. या वयातही काय दिसतात ना…!”, असं राज म्हणाले.
“लोकांमध्ये आशाताईंच्या सौदर्यांबाबत चर्चा सुरु होती. मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसलेत… आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे…याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा :
Video : ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना!’, राज ठाकरेंकडून सौंदर्याचं कौतुक