जिथं बाळासाहेबांचं पहिलं भाषण, तिथंच राज-उद्धव ठाकरे एकत्र; मुंबईच्या विजयी मेळाव्यात एल्गार!

येत्या 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबईत एकत्र विजयी मेळावा होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची महाराष्ट्र वाट पाहतो आहे.

जिथं बाळासाहेबांचं पहिलं भाषण, तिथंच राज-उद्धव ठाकरे एकत्र; मुंबईच्या विजयी मेळाव्यात एल्गार!
balasaheb thackeray and uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Jun 30, 2025 | 5:42 PM

गेल्या अनेक दिवसांपासूव मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे आमच्या दोघांत थेट जरी नसली तरी एकत्र येण्याबाबत चर्चा चालू आहे, असे ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, या युतीआधी दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलै रोजी विजयी मेळाव्याला मुंबईत एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे या मेळाव्याचे आता ठिकाणही ठरले आहे. जिथं शिवसेनाप्रमुख तथा दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे पहिले भाषण झाले होते, त्याच ठिकाणी आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत होणाऱ्या विजयी मेळाव्याचे ठिकाण ठरलेले आहे. येत्या 5 जुलै रोजी हा विजयी मेळावा होणार आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्कात हा ऐतिहासिक मेळावा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले भाषण केले होते. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी याच जागेवरून संपूर्ण शिवसैनिक तसेच महाराष्ट्राला संबोधित केले होते. त्यांच्या या भाषणानंतर शिवसेनेची वेल विस्तारतच राहिली. आता याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाषण करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी केले होते आवाहन

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा म्हणून ठाकरे गट आणि मनसेने संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं. पण त्याआधीच सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करून या मोर्चामधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण आमचं उद्दीष्ट साध्य झालं असलं तरी शिवसैनिक तसेच मराठी भाषाप्रेमी येत्या 5 जुलै रोजी जमणार आहेत. हा हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा नसेल पण हा विजयी वेळावा असेल असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. तसेच त्यांनी यात मनसेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.

मनसेचाही सकारात्मक प्रतिसाद

त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही बंधू शिवाजी पार्कवर एकत्र येत मुंबईत नवा एल्गार करणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर मुंबई पालिका निवडणुकीची घोषणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाचा पट बदलणार आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर होणाऱ्या या विजयी मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.