Raj Thackeray : उद्या महाराष्ट्रात राडा होणार?, राज ठाकरे मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम

प्रत्येक धर्माच्या लोकांना 365 दिवस भोंगे लावण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या अजानच्या समोर हनुमान चालिसा लावा, असे आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले आहे. सरकारनेही याबाबत कठोर भूमिका घेतली असून, याबाबत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Raj Thackeray : उद्या महाराष्ट्रात राडा होणार?, राज ठाकरे मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Image Credit source: TV9
सागर जोशी

|

May 03, 2022 | 9:02 PM

मुंबई : मागील काही दिवस राज्यात चाललेल्या मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी 4 मेचे अल्टिमेटम दिले होते. मात्र सरकारने याला प्रतिसाद न दिल्यामुळे, राज ठाकरे यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात सरकारची भूमिका यात बोटचेपेपणाची असल्याचे सांगत त्यांनी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा सरकारला विसर पडला आहे, अशी टीकाही त्यांनी या पत्रात केली आहे. बाळासाहेबांचं एकणार की शरद पवारांचं (Sharad Pawar), असा खोचक सवालही राज यांनी विचारला आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना 365 दिवस भोंगे लावण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या अजानच्या समोर हनुमान चालिसा लावा, असे आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले आहे. सरकारनेही याबाबत कठोर भूमिका घेतली असून, याबाबत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

राज्यभरात पडसाद उमटण्याची शक्यता

मनसैनिकांची धरपकड होत असली तरी मुंबई, पुण्यात आणि ठाण्यासह राज्यभरात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ठाण्याचे मनेसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातील मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला आहे, भोंगे वाजले तर मुंब्र्यात दाखल होऊ, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. तर पुण्यातही मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरेंविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या प्रकरणात राज ठाकरेंना अटक झाल्यास, राज्यात तमाशा होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाण्यात आत्तापर्यंत 1400 मनसैनिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी बॉन्ड मागितले आहेत. जे उद्या गडबड करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार या भागातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

औरंगाबाद येथील सभेत भडकवणारी विधाने केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची नोटीस घेऊन पोलीस राज ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानाभोवतीही पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरे स्वता औरंगाबादला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून, या प्रकरणात ते स्वताला अठक करुन घेतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे. तर दुसऱ्या एका 2008 सालच्या प्रकरणात राज ठाकरेंविरोधात सांगली कोर्टाने अजामीनपात्र वॉरंटही काढला आहे.

हनुमान चालिसा रोखण्याला भाजपाचा विरोध

हनुमान चालिसा पठण हा भआजपाचा कार्यक्रम नाही, मात्र हे रोखण्याचे काम कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात भाजपा आहे, अशी भूमिका भाजपा नेते आशिष शेलार यांनी घेतली आहे. राज्य सरकारने योगींकडून काहीतरी शिकावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्य सरकार दमनचक्राचा वापर करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सरकारही सज्ज

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज्यात १३ हजारांच्यावर मनसैनिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मनसैनिक भूमिगत झाल्याचीही माहिती आहे. दुसरीकडे मोठ्या मशिदींसमोरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें