‘ते’ पत्र बनावट, हा तर आमच्या बदनामीचा प्रयत्न; पत्रावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण

12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पैठणमध्ये (Paithan) जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मात्र ही सभा एका पत्रामुळे वादात सापडली आहे.

ते पत्र बनावट, हा तर आमच्या बदनामीचा प्रयत्न; पत्रावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 8:27 AM

औरंगाबाद :  12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पैठणमध्ये (Paithan) जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मात्र ही सभा एका पत्रामुळे वादात सापडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षक यांनी हजर रहावे अशा सूचना देणारे एक पत्रक (letter) व्हायरल झालं आहे. या पत्रकावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठीच  हे पत्रक काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र आता या पत्राबाबत शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हे पत्रक बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केलाय.

हा तर बदनामीचा प्रयत्न

या पत्राबाबत शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे की,  सध्या एक पत्र व्हायरलं होत आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 12 सप्टेंबर रोजी  होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र हे पत्रक बनावट आहे. असं पत्र काढून व्हयरल करणे म्हणजे हा निवळ खोडसाळपणा आहे. हा आमच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचं जंजाळ यांनी म्हटलं आहे.

जोरदार शक्तिप्रदर्शन

12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. पैठण हा शिंदे गटाचे आमदार संदीपान भूमरे यांचा मतदारसंघ आहे. काही दिवसांपूर्वी भूमरे यांनी आपल्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. मात्र या सभेत खूर्च्या रिकाम्या असल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते.

मात्र त्यानंतर त्याच मतदारसंघात शिवसेना नेते आदित्य  ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला मोठी गर्दी झाली होती. आता याच पार्श्वभूमीवर शिंदे गट पैठण विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.