भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर ‘मातोश्री’ची कृपा, विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद

| Updated on: Mar 22, 2021 | 10:10 AM

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीव विक्रांत जाधव यांना संधी देण्यात आल्याचं चित्र आहे. (Ratnagiri ZP Election Vikrant Jadhav)

भास्कर जाधवांच्या राष्ट्रवादीवासी चिरंजीवांवर मातोश्रीची कृपा, विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद
भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव
Follow us on

रत्नागिरी : मंत्रिपद न मिळाल्याने खट्टू असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी ‘मातोश्री’ने पावलं उचलली आहेत. भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. भास्कर जाधव शिवसेनेत आले असले, तरी विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. (Ratnagiri ZP Election Shivsena to give chance to Bhaskar Jadhav’s NCP leader son Vikrant Jadhav)

पुतण्याची काकाला धोबीपछाड?

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीवांना संधी देण्यात येत आहे. विक्रांत जाधव यांच्या नावावर मातोश्रीवरुन शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांच्यासाठीही खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. परंतु काका आणि पुतण्यामधील शर्यतीत पुतण्याने बाजी मारल्याचं दिसत आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यासाठी आज निवडणूक होत आहे. बारा वाजेपर्यत उमेदवारी अर्ज भरण्याची तर दुपारी अडीच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 39 इतकं संख्याबळ आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

  • शिवसेना- 39
  • राष्ट्रवादी- 16

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतीपद शिवसेनेने सव्वा सव्वा वर्षांसाठी वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. (Ratnagiri ZP Election Shivsena to give chance to Bhaskar Jadhav’s NCP leader son Vikrant Jadhav)

मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.

शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना

भास्कर जाधव हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीत असताना त्यांना महत्त्वाच्या खात्यांवर तसंच मंत्रिपदावर कामाची संधी मिळाली. तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर देखील त्यांना काम करण्याची संधी शरद पवारांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

फॉर्म्युल्यानुसार सभापतीपद द्या, अन्यथा… रत्नागिरीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

(Ratnagiri ZP Election Shivsena to give chance to Bhaskar Jadhav’s NCP leader son Vikrant Jadhav)