एक पवार विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीसाठी, तर दुसरे पवार थेट मुलाखत घ्यायला

| Updated on: Jul 28, 2019 | 6:03 PM

पक्षांतराचा धडाका सुरु असतानाच आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मात्र सध्या एक वेगळाच योगायोग पाहायला मिळत असून त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.

एक पवार विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीसाठी, तर दुसरे पवार थेट मुलाखत घ्यायला
Follow us on

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग येतो आहे. पक्षांतराचा धडाका सुरु असतानाच आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मात्र सध्या एक वेगळाच योगायोग पाहायला मिळत असून त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे रोहित पवार कर्जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी मुलाखत देत आहेत, तर दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार पार्थ पवार थेट इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

रोहित पवार आणि पार्थ पवार हे पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील दोन महत्त्वाचे चेहरे आहेत. यातील पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करत राजकारणात उडी घेतली, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. दुसरीकडे रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली. आता हे दोन्ही पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाले आहेत. एकीकडे रोहित पवार कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत देत आहेत. दुसरीकडे पार्थ पवार विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे लोकसभेतील पराभूत उमेदवार इतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक उमेदवारी आणि युतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “पार्थ पवार आणि रोहित पवार यांची उमेदवारीवरुन तुलना करायला नको. मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना माहिती असणारे पार्थ पवार नाव दिलं होतं. तेथे विजय अवघड होता म्हणून त्यांना उमेदवारी दिली. रोहित पवार यांना मात्र अजून कर्जत विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली नाही. त्याबाबत अजून चाचपणी सुरु आहे. या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे.”