
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर यांनी NCP शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता असंही वृत्त आलं होतं. तसेच त्यांचा राजीनामा पक्षाकडून मंजूर करण्यात आला नव्हता हे ही समोर आले होते. मात्र आता राजीनाम्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी युटर्न घेतला आहे. त्यांनी मी राजीनामा दिलेला नाही असं विधान करत रुपाली चाकणकर यांच्यावर मोठा आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी, ‘मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. पण या काळात तक्रारी मी अजित पवारांकडे दिलेल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष्या जर प्रांत अध्यक्षांकडून माझ्यावरती गुन्हा करायला लावत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. ही बाब मी अजित पवार यांच्या कानावरती घातली आहे अशी माहिती दिली आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली होती. यावर बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, ‘प्रवक्ते पदावरचे नाव सुद्धा रूपाली चाकणकर यांनी प्रांत अध्यक्षांना सांगून कमी करायला लावलं. रूपाली चाकणकर आणि प्रांत अध्यक्ष यांना जर वाटत असेल की रूपाली ठोंबरे पाटील पक्षात नको तर मी एवढी लाचार नाही. आगामी काळात जर मी पक्षाचा राजीनामा दिला तर त्याची माहिती मीडियासमोर देईल.’
रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुंबईत भेट घेतली होती. त्यामुळे त्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, श्रीकांत शिंदे यांची खासदार निधीच्या कामासंदर्भात भेट घेतली होती. शिंदेंनी माझ्यासारख्या चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला जर विचारलं तर ती मी त्याच्यावरती विचार करेल. कुणामुळे तरी माझं प्रवक्ते पद गेलं, तरीही मी काम करणे थांबवले नाही. शिवसेना शिंदे पक्षाकडून चांगली ऑफर असेल तर मी विचार करेल.