सुषमा अंधारे, बाबाजी काळेही शिंदेंच्या शिवसेनेत येणार? सचिन अहिरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाले?
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना ते आक्रमक झाल्याचे देखील दिसत आहे.

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या गटात प्रवेश करताच सचिन अहिर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. त्यांची बिनविरोध विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये सचिन अहिर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, बाबाजी काळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने लक्ष वेधले आहे.
बाबाजी काळेंविषयी काय म्हणाले?
सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना ‘तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले बाबाजी काळे, सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचे राजकीय भविष्य काय? ते तुमच्यासोबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दिसणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सचिन अहिर यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सचिन अहिर यांनी म्हटले की पक्षाकडून आम्हाला काय मिळालं नाही अशी चर्चा सुरु आहे. पण बाबाजी काळेंनी दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरुन दिलं आहे. ते 20 आमदारांपैकी 52 हजारांचे लीड घेऊन निवडून आले. त्यांचे स्वत:चे कौशल्य यात होतंच पण जिल्हा संपर्कप्रमुख करुन पक्षानेही साथ दिली आहे. यापुढे काय करायचे हे त्यांचे वैयक्तित अधिकार आहेत.
पुढे सचिन अहिर यांनी म्हटले की माझ्यासोबत जे कार्यकर्त्ये पक्षात आले आहेत त्यांना मी सत्ता असतानाही काही देऊ शकलो नाही अशी भावना लोकांमध्ये आहे. कोविडचा काळ होता आणि त्यात महामंडळ वाटप झाले नाही त्यामुळे हे शक्य नव्हते. याचे शल्य सतत कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सुषमा अंधारे यांच्याविषयी काय म्हणाले?
पुढे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना सचिन अहिर आक्रमक झाले. 2022मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार जात होते तेव्हा दुसऱ्याच दिवशी सुषमा अंधारेचा फोन आला होता असा खुलासा अहिर यांनी केला आहे. तिसऱ्या दिवशी सचिन अहिर त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले. त्यावेळी त्या ‘मला काही नको, पण अशा कठीण प्रसंगी मी पक्षासोबत उभी राहीन’ असे म्हणाल्या होत्या. त्यांनी 100 पेक्षा सभा घेतल्या. त्या एक डॅशिंग प्रवक्त्या आहेत. त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे सभागृहात लावून धरले, पण पक्ष त्यांच्या नावाचा विचारच करत नाही अशी खंत सचिन अहिर यांनी व्यक्त केली.