आरक्षण गेलं खड्ड्यात, आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष : संभाजीराजे

आरक्षण गेलं खड्ड्यात!, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा, असा संताप खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला.

आरक्षण गेलं खड्ड्यात, आपल्या 'व्यवस्थेतच' मोठा दोष : संभाजीराजे

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी करुन मोर्चे काढूनही मराठ्यांच्या पदरी काही आरक्षण पडलेलं नाही. फडणवीस सरकारनं गेल्या पाच वर्षात हा प्रश्न मार्गी लावलेला नाही. आरक्षणाची मागणी करत आतापर्यंत 40 हून अधिक तरुणांनी आपलं आयुष्य संपवलं. अलीकडेच दहावीच्या निकालानंतर 94 टक्के पडलेल्या एका विद्यार्थ्यांनं आरक्षण नसल्यानं आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची उद्विग्नता ट्विटद्वारे बाहेर पडली.

आरक्षण गेलं खड्ड्यात!, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा, असा संताप खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला.

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न. त्यातच आरक्षणाअभावी मराठा विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येनंतर खासदार, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. आरक्षण गेलं खड्ड्यात ! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून केली.

उस्मानाबादच्या देवळाली गावातील मराठा समाजातला तरुण अक्षय शहाजी देवकर यानं आत्महत्या केली. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. अक्षयला गणितात 99 मार्क्स होते. त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र दुष्काळ, घरची गरिबी आणि आरक्षण मिळत नसल्यानं प्रवेशात निर्माण झालेल्या अडचणी या तणावातून त्यानं आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत ही आक्रमक भूमिका घेतली.

“मला वाटतंय की आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही?’ असे सवाल करत संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या आणि इतर प्रश्नांवर भाष्य केलं.

“गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहिल ते युवक आणि ज्यांच्यामुळे आज आपलं जिवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी, या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वतःला संपवत आहेत ? भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में छुरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती, असं सांगत संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला.

समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. ‘योग’ करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय? असे सवालही छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केले आहेत.

यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे. केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षच नाही असं समजू नका. ‘शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये’ असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते, ते आजही तंतोतंत खरे आहे.” असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी नेत्यांसह, प्रशासनाला दिला.

संभाजीराजेंचा हा संताप एकवेळ मान्य करता येईल मात्र त्यांनी केलेली मागणी कितपत व्यवहार्य आहे हा खरा प्रश्न आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण सर्व जातींना मोफत करा अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. मात्र त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

शिक्षण मोफत दिल्यानं प्रवेशाचा प्रश्न सुटणार का ?

सगळ्यांनाच मोफत प्रवेश दिले तर मग गुणवत्तेचं काय ?

प्रवेश न मिळालेल्यांना अपेक्षित शिक्षण मिळेल का ?

शिक्षण मोफत मिळेल, नोक-यांमधल्या आरक्षणाचं काय?

शिक्षणापासून वंचित असलेला, आरक्षणाचे लाभ घेत असलेल्या वर्गाला शिक्षण मोफत केल्यानं लाभ मिळेल का? या प्रश्नांची उत्तर मिळवणंही तेवढंच गरजेचं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI