Sambhaji Raje : ‘अजितदादा तुमच्यात धमक असेल, तर आता…’, संभाजीराजेंचा थेट इशारा

Sambhaji Raje : "धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर मी पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही. कुणी दहशत करत असेल तर मी या ठिकाणी येणार. काय चाललंय. बीडचा बिहार करायचा का? त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. हा महाराष्ट्र आपला आहे" असं संभाजी राजे म्हणाले.

Sambhaji Raje : अजितदादा तुमच्यात धमक असेल, तर आता..., संभाजीराजेंचा थेट इशारा
Sambhaji Raje-Ajit Pawar
| Updated on: Dec 28, 2024 | 4:01 PM

“आता लोकशाही आहे. त्यामुळे मी मनोज जरांगेंना सांगितलं तुम्ही शेवटी बोला. त्यांनी मोठेपणा दाखवला. ते म्हणाले गादी महत्त्वाची आहे. त्यामुळे मी शेवटी बोलायला उभा राहिलो. संतोषची हत्या झाली. तेव्हा मी महाराष्ट्रात नव्हतो. हा विराज संतोष भाऊचा मुलगा. मी विराजला पाहिलं. त्यांच्या घरच्या मंडळीने फोटो दाखवला. ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं. त्याची हत्या केली. शिवाजी महाराजांच्या घरात जन्म होऊनही मला ते पाहावलं नाही. हा महाराष्ट्र आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? हे संस्कार शिवाजी महाराजाने दिले का? ज्या क्रूरपणे मारलं गेलं. हे दुर्देव आहे” असं संभाजीराजे म्हणाले. बीडमध्ये आज मस्साजोगचे सरपंच संतोष देखमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा निघाला आहे. या सर्वपक्षीय मोर्चामध्ये संभाजीराजे सहभागी झाले होते.

“ज्यावेळी मी त्यांच्या घरच्या लोकांना भेटलो. चर्चा केली. तेव्हा एकच निर्णय घेतला. तो निर्णय हा होता. हा जो महोरक्या आहे. त्याचा नेता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो. तो आश्रयदाता धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका. मी त्यावेळी सांगितलं होतं. त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर मी पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही. कुणी दहशत करत असेल तर मी या ठिकाणी येणार. काय चाललंय. बीडचा बिहार करायचा का? त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. हा महाराष्ट्र आपला आहे” असं संभाजी राजे म्हणाले.

‘हा मोहरक्या खंडणीत दोषी आहे’

“हा मोहरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोललंय. मुख्यमंत्री त्यांच्या भााषणात बोलतात. मग त्या मोहरक्याला अटक का झाली नाही? हा प्रश्न आहे. पंकजा मुंडे सभेत म्हणतात, हा वाल्मिक कराड ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही. हे कोण बोलतं. पंकजा मुंडे बोलतात. धनंजय मुंडे म्हणतात आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. घरचे संबंध आहेत. व्यवहारिक संबंध आहे” अशी टीका संभाजीराजे यांनी केली.

‘ही दहशत खपवून घेणार नाही’

“वटमुख्त्यार पत्रही त्यांना व्यवहार करण्यासाठी दिले आहे. जो विश्वासू असतो त्यालाच वटमुख्त्यार पत्र दिलं जातं. त्यामुळे कराडला कुठे ठेवलं हे धनंजय मुंडेंना माहीत नाही. पण आम्ही ही दहशत खपवून घेणार नाही” असा इशाराच संभाजी राजे यांनी दिला.

‘तुम्ही आता काम करून दाखवा’

“अजितदादा तुम्ही प्रकटपणाने बोलला असाल माझी काम करण्याची पद्धत ही आहे. तुम्ही आता काम करून दाखवा. तुमची हिंमत असेल. तुमच्या धमक असेल तर आता काम करून दाखवा. एक एक वार केलेत. भयंकर वार केलेत. फुले, आंबेडकर यांचं नाव घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?” असा सवाल संभाजी राजे यांनी विचारला.