मनसेच्या अधिवेशनानंतर राज ठाकरे नव्या भूमिकेत दिसणार, संदीप देशपांडे यांचे संकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी काळात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Sandip Deshpande on New Form of Raj Thackeray.

मनसेच्या अधिवेशनानंतर राज ठाकरे नव्या भूमिकेत दिसणार, संदीप देशपांडे यांचे संकेत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी काळात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Sandip Deshpande on New Form of Raj Thackeray. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी पक्षाचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. ‘या महाअधिवेशनापासून तुम्हाला नव्या स्वरुपातील राज ठाकरे पाहायला मिळतील, अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या नव्या राजकीय भूमिकेचे संकेत दिले (Sandip Deshpande on New Form of Raj Thackeray).

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेचा दुखावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवण्यासाठी ही रणनीती बनत असल्याचं बोललं जात आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक अलीकडेच पुण्यात झाली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना ‘आपला शत्रू कोण?’ असा थेट सवाल केल्याचंही बोललं जात आहे. एकेकाळी मनसेने नरेंद्र मोदी आणि भाजपची स्तुती केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला विरोध केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या भाजपविरोधी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेबरोबर सत्ता स्थापन केली. मनसेला काहीच फायदा झाला नाही. आगामी काळात महापालिका निवडणुकीत आपला शत्रू कोण ते जाहीर करावं, अशीही आग्रही मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्याचाही माहिती मिळत आहे.

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभाग घेतल्यानं त्यांचा हिंदुत्ववादी मतदार अवस्थ असल्याची बरिच चर्चा आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाअधिवेशनाची घोषणा केली. मनसेने आपल्या 13 वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत एकही महाअधिवेशन आयोजित केलेलं नाही. गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर होणाऱ्या या महाअधिवेशनाच्या निमित्ताने मनसे एका मोठ्या शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. मनसे यावेळी कोणती भूमिका घेते, याकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच विरोधी भाजपचेही लक्ष लागले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची धार नक्कीच कमी झालेले आहे. त्यामुळे राजकारणात सध्या हिंदुत्वाची पोकळी आहे आणि ही हिंदुत्वाची पोकळी भविष्यकाळात आक्रमक पद्धतीने मनसेकडून भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीपासूनच बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. बाळासाहेबांप्रमाणेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी राज ठाकरे यांनी संघटनेची सुरुवात केली. राज आणि बाळासाहेब यांचं नातं काका-पुतण्यापेक्षा खूप पुढचं आहे. त्यामुळेच राज यांनी आपल्या कार्यक्रमाचे औचित्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसाला ठेवलं आहे, असं मत राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनवणे यांनी व्यक्त केलं.

23 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिवेशन होणार आहे. हे मनसेचं पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक येतील. या अधिवेशनातून मनसेचे कार्यकर्ते नवी ऊर्जा घेऊन जातील आणि हे विचार घरोघरी पोहोचवतील, असा विश्वास मनसेकडून व्यक्त केला जात आहे.

यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, “राज ठाकरेंनी आझाद मैदानावर मोर्चा काढला तेव्हाही अशीच चर्चा सुरू होती. त्यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मन सैनिक ‘महाराष्ट्र धर्म’ मानतो आणि त्याच धर्मासाठी लढतो, असं स्पष्ट केलं होतं. आम्ही काही धर्म बदलला नाही. हे काही भगवं राजकारण वगैरे काही नाही. महाराष्ट्रधर्म हाच आमचा विचार आहे. महाराष्ट्र धर्मासाठी लढू आणि जो संघर्ष करायचा तो आम्ही निश्चित करू.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI