शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या गनिमी काव्याशी तुलना, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी...

शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या गनिमी काव्याशी तुलना, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात
| Updated on: Dec 01, 2022 | 12:23 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी केली गेली आहे. शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यामुळे छत्रपतीच्या अपमानाच्या मुद्द्यावरून शिंदे-भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना शिवरायांशी केली. त्यानंतर मोठं वादंग निर्माण झालं. त्यानंतर काल मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय.

राजकीय नेत्यांकडून वारंवार छत्रपतींचा अपमान केला जातोय. वादग्रस्त विधानांची मालिका थांबता थांबत नाहीये. त्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लोढा यांचं विधान काय?

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.

भगतसिंग कोश्यारी यांचं विधान काय?

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीदान समारंभात कोश्यारी यांनी गडकरींची तुलना थेट शिवरायांशी केली. “तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील”, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झालाय. कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.